सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) : सांगोला – मिरज रोड वरील करांडेवाडी उड्डाणपुलाजवळील सर्विस रोडवर भरधाव मालट्रकने ओमनी कारला समोरुन जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कार चालकासह तिघेजण जागीच ठार झाले. तर कारमधील लहान मुले, महिला, पुरुष असे १३ जण जखमी झाले.
उदनवाडी येथील चालक दाजीराम लक्ष्मण शिंगाडे याने उदनवाडी येथून ३ पुरुष, ३ महिला, ६ लहान मुले असे ११ लोकांना ओमनी कारमध्ये घेवून सिंदगी (कर्नाटक)निघाले होते. त्यांची कार करांडेवाडी फाटा उड्डाणपुलाजवळ उजव्या बाजूस असणाऱ्या सर्विस रोडने जात असताना समोरुन भरधाव येणा-या एम एच -१३-सीयु -६०८६ या माल ट्रकने कारला समोरुन जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.
कारचालक दाजीराम लक्ष्मण शिंगाडे (४२ रा.उदनवाडी ता.सांगोला) ,कावेरी मनोज हरीजन( ७ रा.निरलगी ता.ताळेकोटी जि.विजापूर) व गुड्डी चंद्रकांत मगिरी (८ रा.कोंडगोडी ता.जेवरगी जि.गुलबर्गा) अशी ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. तर मनोज महादेव आप्पा हरीजन (४०),भारती मनोज हरीजन (३० दोघेही रा.निरलगी ता.ताळेकोटी जि.विजापूर) , मानतेश मगिरी-३२ ,चंद्रकांत दुराण्णाप्पा मगिरी(२५), ताराबाई चंद्रकांत मगिरी -(३०), अंबिका मानतेश मगिरी (२८) ,मुत्तूराम चंद्रकांत मगिरी (२), चिन्नू चंद्रकांत मगिरी (५), दिपा मानतेश दुराण्णाप्पा मगिरी (१६), लक्ष्मी चंद्रकांत मगिरी (६), कृष्णात शिवाप्पा मगिरी (३० सर्वजण रा.कोंडगोडी ता.जेवरगी जि.गुलबर्गा) , शरणू हिरगप्पा मगिरी (२८) व परशू शरणाप्पा चलवादी (२८) रा. वारणानगर जि. कोल्हापूर अशी जखमींची नावे आहेत.






