गणेश गायकवाड व टोळीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांचा दणका मोका अंतर्गत कारवाई

पुणे (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक सदानंद काळे) : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सांगवी, हिंजवडी आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असलेल्या गायकवाड टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.या टोळीमध्ये औंध परिसरातील प्रसिद्ध उद्योजक नानासाहेब गायकवाड, त्यांचा मुलगा गणेश गायकवाड यांच्यासह अन्य तिघांचा समावेश आहे.

याबाबत अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी मंगळवारी (दि. 3) आदेश दिले आहेत.टोळी प्रमुख गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड (वय 36), नानासाहेब शंकर गायकवाड (दोघे रा. आयटीआय रोड, औंध, पुणे), गणेश ज्ञानेश्वर साठे (वय 35, रा.हनुमान मंदीरा समोर, पिपळे निलख, पुणे), राजु दादा अंकुश (रा. श्रावणी बिल्डींग, गल्ली नंबर एक, पिंपळे गुरव, पुणे), दीपक गवारे (रा. जंगली महाराज रोड, शिवाजी नगर, पुणे) या टोळीविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस उप महानिरीक्षक तथा अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार गणेश गायकवाड, नानासाहेब गायकवाड आणि टोळीवर दंगा करून खुनाचा प्रयत्न करणे, गुलाम बनविण्याच्या इराद्याने अपहरण करून मारहाण करणे, कट रचून बनावट कागदपत्रांद्वारे फसवणुक करणे, खंडणी उकळण्यासाठी मारहाण करणे, अनैसर्गिक संभोग करून खूनाचा प्रयत्न करणे, दरोडा घालणे असे एकूण आठ गुन्हे पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयातील हिंजवडी व सांगवी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तसेच पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील चतुःश्रुंगी, चंदननगर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीणच्या हद्दीतील पौड पोलीस ठाण्यात आणखी काही गुन्हे दाखल आहेत.

गायकवाड टोळीतील आरोपी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात मोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सांगवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी उपायुक्त आनंद भोईटे यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्तांकडे पाठवला होता.याबाबत अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी मंगळवारी या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त . कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त , रामनाथ पोकळे, सुधीर हिरेमठ , पोलीस उप – आयुक्त ( गुन्हे ) . आनंद भोईटे , पोलीस उप – आयुक्त , परिमंडळ -२ , डॉ . प्रशांत अमृतकर , सहायक पोलीस आयुक्त , गुन्हे -१ यांचे मार्गदर्शनाखाली . राजेंद्रसिंह गौर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , पी.सी.बी. गुन्हे शाखा , रंगनाथ उंडे . वरिष्ठ पोलीस निरीक्षक , सांगवी पोलीस ठाणे , तसेच अंमलदार पोलीस हवालदार सचिन चव्हाण , पी.सी.बी. गुन्हे शाखा , पो.शि. शिमोन चांदेकर , सांगवी पोलीस ठाणे , यांचे पथकाने केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here