घर खरेदीत दांपत्याची ९० लाखांची फसवणूक; दिरंगाईबद्दल पोलिसांनाच सुनावले खडे बोल

पुण्यातील बांधकाम व्यवसायकावर गुन्हा दाखल

पुणे (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक सदानंद काळे) : बांधकाम विकसकाकडून तब्बल ९६ लाख रुपयांची फसवणूक होऊनही खरेदीदार ग्राहकाच्या तक्रारीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणाऱ्या वाकड पोलिसांची पिंपरी चिंचवडच्या पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी नुकतीच चांगलीच कानउघाडणी केली. शिवाय तात्काळ संबंधित बांधकाम विकासकासह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी मागील पाच वर्षापासून वाकड पोलिसांकडे चकरा मारून कंटाळलेल्या ग्राहक दांपत्याने कृष्णप्रकाश यांच्या कामाचे आणि तातडीने केलेल्या कारवाईबद्दल कौतुक केले.

अमर पाल सिंग (विकासक), सुधीर कुमार, प्रकाश मारुती डांबरे (रा. माई मंगेशकर हॉस्पिटल जवळ, वारजे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी हर्षला राजेश पिल्ले (रा. पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली आहे. हर्षला आणि राजेश पिल्ले या दांपत्याने आपली कैफियत प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडली.आरोपी अमर पाल सिंग याचा वाकड येथे ओमेगा पॅरडाईज नावाचा गृहप्रकल्प आहे. त्यात सहाव्या मजल्यावर पिल्ले दांपत्याने सदनिका क्रमांक ६०९ आणि ६१० या कव्हर्ड पार्किंगसह ९६ लाख १२ हजार रुपायांना खरेदी केल्या होत्या. त्यांनी ही रक्कम रोख आणि धनादेशाद्वारे वेळोवेळी विकासक सिंग याला दिली. त्याच्या पावत्याही घेतल्या.

कोथरूड डेपोजवळील दुय्यम निबंधक, हवेली येथे दस्त नोंदणी होऊन खरेदी खत देखील झाले होते.दरम्यान, या गृहप्रकल्पाच्या बांधकामाला काही कारणांनी स्थगिती मिळाली. त्यामुळे प्रकल्पाचे पुढील काम बारगळले. त्यामुळे फिर्यादींनी आरोपी सिंग यांच्याकडे दिलेली रक्कम परत मागितली. त्यावर सिंग याने फिर्यादीच्या नावाचे खरेदीखत रद्द करण्यास सांगितले. त्यांनतर या सदनिका अन्य ग्राहकाला विक्री करून ९६ लाख रुपये परत करण्याचे आश्वासन दिले. तसेच दुसऱ्या ग्राहकांना कर्ज मंजूर व्हावे, यासाठी दोन करेक्शन डीड बनविण्यास सांगितले. त्यानुसार राजेश यांनी करेक्शन डीड बनवून दिल्या. त्यानंतर सिंग याने सदनिका परत केल्याच्या बदल्यात राजेश पिल्ले यांना काही धनादेश दिले. मात्र ते धनादेश वटले नाहीत. त्यामुळे सदनिकाही गेल्या आणि पैसेही, अशी अवस्था झाली, अशी माहिती सौ. हर्षला यांनी सांगितली.

या प्रकरणी तक्रार देण्यासाठी दुय्यम निबंधकांकडे पाहणी केली असता आरोपी सिंग, इस्टेट एजंट – ब्रोकर सुधीर कुमार आणि नोटरी करणारा प्रकाश डांबरे यांनी संगनमताने आमच्या बनावट सह्या करून खोटे कुलमुखत्यार पत्र तयार करून दोन्ही सदनिकांची विक्री करून फसवणूक केल्याचे समोर आले, असेही हर्षला यांनी सांगितले.वाकड पोलिसांची टोलवाटोलवी :या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्यादीनी वाकड पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज केला. मात्र त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. त्यावर तब्बल दोन वर्षांनी कार्यवाही करीत हे प्रकरण दिवाणी असल्याचे नमूद करून पोलिसांनी जबाबदारी झटकली आणि अर्ज निकाली काढला. तसे लेखी दिले, कोर्टात जाण्यास सांगितले.

पोलिस आयुक्त कार्यालयात कायदेशीर सल्लागाराने मागितली ५ लाखांची लाच :पोलिसांच्या कामचुकवेगिरीला कंटाळून राजेश पिल्ले यांनी पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे आपली कैफियत मांडली. त्यांनी वेळ देऊन तक्रार ऐकून घेतली. तसेच तात्काळ आपल्या कायदेशीर सल्लागारकडे फाईल देऊन नियमाप्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.दरम्यान, या कायदेशीर सल्लागाराने ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. हा संवाद राजेश पिल्लेंनी रेकॉर्ड केला. तसाच तो आयुक्त कृष्णप्रकाश यांना दाखविला. यावर संतापलेल्या कृष्णप्रकाश यांनी संबंधित कायदेशीर सल्लागाराला खडे बोल सुनावले. पगार सरकारचा घेता आणि चाकरी विकासकाची करता. हे खपवून घेतले जाणार नाही, अशा कठोर शब्दांत त्यांनी संबंधित पोलिसांना झापले. आणि त्यांनतर तात्काळ विकासाकासह तिघांविरुद्ध आयपीसी कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करून घेतला, अशी माहिती राजेश पिल्ले यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here