पालिकेच्या विभाग कार्यालयांतून नागरिकांचे समाधान होईल अशी सेवा मिळावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एच पश्चिम’ विभाग कार्यालयाच्या नव्या भव्य वास्तूचे लोकार्पण

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : महानगरपालिका, शासकीय कार्यालये इत्यादी ठिकाणी आपापली कामे घेऊन येणारे नागरिक जरी कधी कपाळावर आठी घेऊन येत असले, तरी जाताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू असायला हवे. तरच आपल्या कामांचे आणि प्रयत्नांचे सार्थक झाले असे म्हणता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एच पश्चिम’ विभागाच्या नवीन वास्तूच्या लोकार्पण प्रसंगी श्री. ठाकरे बोलत होते.

या कार्यक्रमास परिवहन मंत्री ॲड्.अनिल परब, पर्यटन व पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमास उपमहापौर ॲड. सुहास वाडकर, सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांचीही उपस्थिती होती.

मुख्यमंत्र्यांनी ‘कोविड’मध्ये नागरिकांची अव्याहतपणे सेवा करणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामगार – कर्मचारी -डॉक्टर – वैद्यकीय कर्मचारी व अधिकारी यांचे विशेष कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. अव्याहतपणे कार्यरत राहणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एच पश्चिम’ विभागाच्या नव्या वास्तूत आल्यानंतर आपण खरोखरच महापालिकेच्याच कार्यालयात आलो आहोत का? असा प्रश्न पडावा, इतकी ही वास्तू सुविधापूर्ण आणि प्रभावी झाली असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की,सामान्य नागरिकांचे जन्म प्रमाणपत्रांच्या निमित्ताने महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांशी जन्मापासूनचे नाते असते. हे नाते आणखी दृढ होण्यास या सुविधापूर्ण कार्यालयांमुळे निश्चितच मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कोविड काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या अव्याहत कामांमुळे आज जगभरात ‘मुंबई मॉडेल’चा नावलौकिक आहे. अनेक गोष्टींची सुरुवात ही मुंबईत होते आणि मग जगभरात त्याचे अनुकरण केले जाते. आज लोकर्पित होत असलेली ‘एच पश्चिम’ विभाग कार्यालयाची वास्तू आणि या वास्तूतून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा या देखील अशाच अनुकरणीय ठरतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here