एसटीवर दरोडा टाकणारे आरोपी एक कोटींच्या मुद्देमालासह अटकेत

पुणे (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक सदानंद काळे) : पोलीस असल्याची बतावणी करून एसटी बस अडवून बसमधील प्रवाश्यांजवळील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा १,१२,३६,८६०/- रु. चा ऐवज लुटून नेण्यात आला आहे. ही घटना २ ऑगस्ट सोलापूर ते पुणे हायवे रोडला घडली होती.

याबाबत हितेंद्र बाळासो जाधव (रा. वाघोशी, फलटण) यांनी ३ ऑगस्ट रोजी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तीन आरोपींना अटक केली असून, आणखी आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

१) रामदास भाऊसाहेब भोसले (वय-३० वर्षे) २) तुषार बबन तांबे (वय- २२ वर्षे, दोघेही रा. वरुडे, ता. शिरूर, जि. पुणे) ३) भरत शहाजी बांगर (वय-३६ वर्षे, रा. गणेगाव खालसा, ता. शिरूर, जि. पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील भरत हा नात्यानं रामदासच्या बहिणीचा पती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २ ऑगस्ट रोजी हितेंद्र जाधव आणि एसटीतील इतर प्रवासी लातूर ते मुंबई या एसटी बसमधून सोलापूर ते पुणे हायवे रोडने प्रवास करीत असताना वरील आरोपी व त्यांचा आणखी एक साथीदार यांनी एसटी बसला गाडी आडवी मारून एस टी थांबविली. त्यातील प्रवासी हितेंद्र जाधव व इतर प्रवाश्यांना खाली उतरवले. त्यांना मारहाण व दमदाटी करून त्यांच्याकडील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण १,१२,३६,८६०/- रु. किमतीचा मुद्देमाल लुटून नेला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक घनवट यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून तपासासाठी पाठविले.

गुन्ह्याचा तपास करीत असताना वरुडे येथील गणेश भोसले व त्याचा भाऊ रामदास भोसले यांनी व त्यांच्या साथीदारांनी मिळून हा गुन्हा केला असल्याची बातमी मिळाली. आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांना रामदास भोसले हा खराडी बायपास येथे त्याच्यासाथीदारांसह पळून जाण्याच्या तयारीत असल्याचीही बातमी पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी तत्काळ तेथे जाऊन वरील तीन आरोपींना ताब्यात घेतले. गुन्ह्यातील चोरलेल्या मालापैकी आरोपी तुषार तांबे याच्याकडून १,५०,०००/- रु. तर भरत बांगर याच्याकडून ३०,०००/- रु. पोलिसांनी जप्त केले आहेत. तसेच आरोपी रामदास भोसले याने त्याच्या उसाच्या शेतात लपवून ठेवलेले ९१,०३,०४०/- रु. रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ९२,८४,५४०/- रु. माल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली कार, बुलेट मोटारसायकल, ज्युपिटर मोटारसायकल पोलिसांनी जप्त करून एकूण १,००,५४,५४०/- रु.चा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here