पनवेल (प्रतिनिधी विनया मेढेकर) : पनवेल सत्र न्यायालयात शुक्रवारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात टाटा इंडिकॉम कंपनीचे नोडल अधिकारी बेबी जॉन यांची महत्त्वाची साक्ष नोंदविण्यात आली. अश्विनी बिद्रे यांची ज्या दिवशी हत्या झाली , तेव्हापासून तीन दिवस कुंदन भंडारी याचे लोकेशन मीरा रोडमध्येच होते , अशी साक्ष टाटा इंडिकॉम कंपनीचे नोडल अधिकारी बेबी जॉन यांनी पनवेल जिल्हा सत्र न्यायालयात दिली. जॉन यांच्या साक्षीमुळे या हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरूंदकरसह अन्य आरोपींच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे .
कुरुंदकर याने आपल्या मीरा रोड येथील फ्लॅटमध्ये अश्विनी बिद्रे यांची ११ एप्रिल २०१६ रोजी सायंकाळी हत्या केली. त्यानंतर त्याच दिवशी रात्री उशिरा कुंदन भंडारी हा मीरा रोडमध्ये आला आणि कुरुंदकरचा फ्लॅट ज्या परिसरात होता , त्याच परिसरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबला. त्यानंतर मृतदेहाचे तुकडें खाडीत टाकण्यासाठी कुंदन याने एका दुकानात जाऊन जड लोखंडी वस्तूंची खरेदी केली होती . १३ एप्रिल रोजी पहाटे दीडच्या सुमारास वाशी खाडीमध्ये ज्या ठिकाणाहून अश्विनीच्या मृतदेहाचे तुकडे गोणीत बांधून पाण्यात टाकण्यात आले होते , त्या ठिकाणीही कुंदन हजर होता.
कुंदन हा कुरुंदकरचा खासगी वाहन चालक असून तो टाटा इंडिकॉमचा मोबाईल वापरत असे . टाटा इंडिकॉमचे नॉडल अधिकारी बेबी जॉन यांनी दिलेल्या साक्षीमध्ये आज या सर्व घटनाक्रमांचा उलगडा झाला . अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या न्यायालयात विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जॉन यांची आज संरतपासणी घेतली. 11, 12, 13 एप्रिल 2016 ला कुंदन भंडारी याचे फोन लोकेशन कोठे होते? याबाबत सविस्तर प्रश्नावली विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी बेबी जॉन यांना केली. यावेळी एसीपी संगीता शिंदे-अल्फांसो आणि क्राइम ब्रांचचे इतर अधिकारी उपस्थित होते.ऊलट तपास बुधवार 11 ऑगस्टला होणार आहे.
अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा खटला उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार निकाली काढायचा आहे . मात्र , आरोपींचे वकील विशाल भानुशाली हे आजारी असल्यामुळे महिनाभर या खटल्याचे कामकाज ठप्प राहिले .आता न्यायालयाने या खटल्याचा वेग वाढविला आहे .






