आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन

पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना प्राणज्योत मालवली

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन झालं आहे. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल, संजय आणि स्नूषा व नातवंडे असा परिवार आहे.

श्रीगुरु बालाजी तांबे यांनी वृत्तपत्रलेखनातून आरोग्य विषयक जागृती केली. त्यातून त्यांनी विविध विषयांवर शेकडो लेख लिहीले. तसेच, नागरिकांमध्ये आयुर्वेदाबद्दल जिज्ञासा निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. श्रीगुरु तांबे यांनी आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार यांचा पाच दशके प्रचार व प्रसार केला. शास्त्रशुद्ध आणि गुणत्तापूर्ण आयुर्वेदीक औषधांची संशोधन निर्मिती करून ती सामान्यांपर्यंत पोचविण्याचे कार्य त्यांनी केले. तसेच, त्यातून विविध समाज घटकांना आयुर्वेदाशी जोडले. आयुर्वेद हे केवळ भारतापुरते मर्यादीत न ठेवता त्याचा प्रसार केला आणि त्याचे महत्त्व परदेशातील नागरिकांनाही आपल्या ओघवत्या शैलीतून पटवून दिले.

बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ तसेच पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक होते. बालाजी तांबे यांना लहानपणापासूनच वडिलांकडून आयुर्वेदाची शिकवण मिळाली होती. बालाजी तांबे यांनी आयुर्वेदातली आणि अभियांत्रिकीमधली पदवी एकाच वर्षी मिळवली होती. त्यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावर संशोधन केलं होतं. बालाजी तांबे यांच्या गर्भसंस्कारावरील पुस्तकांना मोठी मागणी होती. या पुस्तकांच्या लाखो प्रती विकल्या गेल्या. इंग्रजीसह सहा भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झालं आहे. केवळ महाराष्ट्रात नाही तर देश-विदेशात त्यांच्या आयुर्वेद उपचारांना मागणी होती.

बालाजी तांबे यांनी लिहिलेली पुस्तके
आत्मरामायण (गुजराती भाषेत), आयुर्वेद उवाच. भाग १, २.(मराठी), आयुर्वेदीय गर्भसंस्कार (मराठी, गुजराती, इंग्रजी), आयुर्वेदिक घरगुती औषधे (मराठी व इंग्रजी), चक्र सुदर्शन (मराठी), मंत्र आरोग्याचा, मंत्र जीवनाचा, वातव्याधी, श्री गीता योग – शोध ब्रह्मविद्येचा (इंग्रजीत Peacock Feathers) (१८ भाग). (प्रकाशनाधीन), श्री रामविश्वपंचायतन (मराठी), संतुलन क्रियायोग (मराठी), स्त्रीआरोग्य, स्वास्थ्याचे २१ मंत्र. (भाग एकाहून अधिक.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here