थेट मंत्रालयातच साजरी झाली गटारी; विरोधक आक्रमक

मंत्रालयातील दारुच्या बाटल्याप्रकरणी १५ दिवसात कारवाई करण्याची प्रवीण दरेकरांची मागणी

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येथे ये-जा करत असतात. मंत्रालयात पास शिवाय प्रवेश दिला जात नाही. त्यातच कोरोनामुळे देखील सर्वांना प्रवेश दिला जात नाही. ज्यांना प्रवेश मिळतो त्यांची काटेकोर तपासणी केली जाते. मात्र, त्याच मंत्रालयाच्या आवारात आता दारूच्या बाटल्या सापडू लागल्या आहेत. मंत्रालयात राजपात्रित अधिकाऱ्यांच्या उपहारगृहाच्या खालील बाजूस एक खोली आहे. तिथे दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. या बाटल्या मंत्रालयात गेल्याच कशा? त्या नेमक्या कुणाच्या? असा प्रश्न विचारला जात आहे.

मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळाला आहे. ही महाराष्ट्रातील परंपरेला काळीमा फासणारी घटना आहे. या दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्याच कशा? याची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. तसेच या गंभीर प्रकरणाची अप्पर मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन १५ दिवसांच्या आत उच्चस्तरिय चौकशी करण्याची मागणीही दरेकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल. तसेच हे कृत्य करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. ही अत्यंत गंभीर बाब आहे. याप्रकरणाची योग्य ती चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाईल. मंत्रालयाची संपूर्ण सुरक्षाव्यवस्था ही पोलीस प्रशासनाकडेच असते. पण मंत्रालय म्हणजे सर्व मंत्री, सर्व विभागांचा विषय येतो. हा केवळ गृहमंत्री किंवा पोलिसांचा विषय नाही’, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here