मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून, राज्यातील हॉटेल व्यावसियकांसाठी दिलासादायक निर्णय देखील घेतला गेला आहे.. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारपरिषदेत याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार आता १५ ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल, रेस्तराँ, मॉल्स रात्री १० वाजपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश असणार आहे. तर, धार्मिकस्थळ व सिनेमागृह पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खासगी कार्यालये, विवाह सोहळे आणि इतर गोष्टींबाबत नेमकी काय शिथीलता देण्यात आली आहे, याविषयी माहिती दिली आहे. ‘मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्य विभागाकडून निर्बंध शिथील करण्याबाबत प्रस्ताव गेला होता, त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केली आहे,’ असं राजेश टोपे म्हणाले.
उपाहारगृहे (रेस्तराँ) यांना त्यांच्या क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत मान्यता देण्यात आलेली आहे. खुल्या प्रांगणात किंवा लॉनमध्ये या ठिकाणी होणारे जे विवाहसोहळे आहेत, त्याल जास्तीत जास्त २०० संख्येची परवानगी असेल आणि हॉलमध्ये जी आसन क्षमता असते, त्यामध्ये ५० टक्के परवानगी देण्यात आलेली आहे किंवा १०० या पेक्षा जास्त नाही.
सर्व दुकानांना रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली गेली आहे. त्याचबरोबर सिनेमा व मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे पुढील आदेशापर्यंत तूर्त तरी सुरू करण्यास परवानगी नाही. धार्मिक स्थळांना देखील तूर्त बंदी असणार आहे. इनडोअर स्पोर्ट्समधील खेळाडू व तेथील कर्मचारी, व्यवस्थापन यांचे देखील लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेले असतील तर, जे काही इनडोअर स्पोर्ट्स आहे त्यामध्ये मग बॅडमिंटन, टेबल टेनिस आदी सर्व खेळांना परवानगी दिली गेली आहे.
शॉपिंग मॉल्स पूर्ण आठवडाभर १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास हरकत नाही, अशी मान्यता दिली गेली आहे. परंतु त्यामध्ये जाणारे जे ग्राहक आहेत, त्यांनी डबल डोस घेतलेला असण्याची आवश्यकता आहे आणि दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण केलेल असण्याची आवश्यकता आहे. तसं सर्टिफिकेट दाखवणाऱ्यांना मॉलमध्ये जाण्यास कुठलीही अडचण नाही.






