नंदुरबारकरांच्या चिंतेत वाढ; पुन्हा कोरोना संसर्ग वाढला

  • 207 पैकी 44 व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
  • आजपर्यंत जिल्ह्यात 33 लोकांचा कोरोना संसर्गाने मृत्यू
  • नंदुरबारकरांनो वेळीच सावधान व्हा!

शहादा (विजय पाटील) – जिल्ह्यात आठ दिवस कडकडीत लॉक डाऊनचे पालन करून जनतेने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आवाहनाला पूर्ण प्रतिसाद दिला.परंतू लॉक डाउन संपल्यानंतर आज 44 व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 42 व्यक्ती नंदुरबार शहरातील असून एक व्यक्ती नवापूर व एक तळोदा येथील आहे .म्हणून ही बाब चिंता वाढविणारी आहे. प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही जनता त्याकडे सोयीस्कर रित्या डोळेझाक करतांना दिसत आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर लगेचच जिल्ह्यातील चारही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी करतांना दिसून आले. कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टंसिंगचे पालन जनतेकडून करण्यात आले नाही परिणामी संसर्ग वाढीस चालना मिळाल्याची बाब समोर आली आहे.
जिल्ह्यातील लोकांनी वेळीच याचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. सुरुवातीच्या काळात जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता परंतु आता करोना या जागतिक महामारीचा विळखा जिल्ह्याला बसत आहे. कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी प्रयत्नांची पराकाष्टा करीत असून त्यांच्या प्रयत्नांना जनतेनेही सहकार्य करणे अपेक्षित आहे.आज पर्यंत 33 जणांना करोना संसर्गाने आपला प्राण गमवावा लागला आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 550 च्या पार गेलेली असून 382 रुग्ण संसर्ग मुक्त झालेले आहेत . जवळपास 125 रुग्णांवर सध्या कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत, आणखी 528 अहवाल प्रलंबित आहेत.प्रशासन आणि जनता यांनी एकत्रितपणे करोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here