- थोर गणितज्ज्ञ भास्कराचार्यांच्या ‘ लिलावती ‘ ग्रंथावर मासिक वेबिनार मालिकेस प्रतिसाद
- भारतीय गणिती वारसा पुढे आणण्यासाठी ‘ अंक नाद ‘ ॲपचा पुढाकार
- विद्यार्थ्याला ‘कोविद ‘संबोधण्याचे उदाहरण दुर्मिळ :डॉ सुधाकर आगरकर
पुणे (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक सदानंद काळे) : ‘ गणितासारखा रुक्ष विषय भास्कराचार्यांनी संस्कृत कवितेच्या रूपात मांडला . गणित रंजक रित्या मांडले .गणिताची दैनंदिन जीवनाशी सांगड घातली,हे योगदान अभूतपूर्व आहे ‘,असे प्रतिपादन गणित संशोधक, अभ्यासक डॉ. सुधाकर आगरकर यांनी केले . ‘अंकनाद ‘ या गणिताची गोडी लावण्याकरिता तयार करण्यात आलेल्या अॅप कडून थोर भारतीय गणितज्ज्ञ भास्कराचार्यांच्या ‘ लिलावती ‘ या ग्रंथावरील वेबिनार मध्ये ते बोलत होते .
‘अंकनाद ‘ या गणिताची गोडी लावण्याकरिता तयार करण्यात आलेल्या अॅप कडून थोर भारतीय गणितज्ज्ञ भास्कराचार्यांच्या ‘ लिलावती ‘ या ग्रंथावर गणित संशोधक, अभ्यासक डॉ. सुधाकर आगरकर यांच्या मासिक वेबिनार मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पुढील व्याख्यान सत्र आयोजित करण्यात आले .या सत्रात इष्ट्कर्म ,संक्रमण या संकल्पनांचा आद्य गणिती भास्कराचार्य यांनी लीलावती या आपल्या ग्रंथात घेतलेला वेध समजून सांगण्यात आले. १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच या वेबिनार मालिकेचा दुसरा भाग सादर होणार आहे . गुणकर्म या संकल्पनांचा आद्य गणिती भास्कराचार्य यांनी लीलावती या आपल्या ग्रंथात घेतलेला वेध समजून सांगण्यात येणार आहे. वर्षभर हा उपक्रम चालणार आहे.आजच्या वेबिनारमध्ये वैशाली लोखंडे यांनी प्रास्ताविक केले . मंदार नामजोशी,समीर बापट आदी सहभागी झाले .
डॉ सुधाकर आगरकर म्हणाले,’भास्कराचार्यांनी गणित सोडवून घेण्याच्या पडताळ्याच्या अभिनव पद्धती निर्माण केल्या. प्रत्येक वेळी उत्तराची खात्री करून घेतली जात होती. गणितासारख्या रुक्ष विषय त्यांनी संस्कृतमधून रंजकरित्या मांडला .’लीलावती ‘ ग्रंथामध्ये गणित उदाहरण घालताना भुंगे ,हत्ती ,वृक्ष ,फुले भेटतात. कोडी घातल्याप्रमाणे भास्कराचार्य गणित सोडवायला सांगत. गणिताचे नियम सांगणारे श्लोक छोटे असल्याने समजणे सोपेही होते . ‘गणित कोविद’ हा शब्द आपल्याला त्यांच्या लेखनात पाहायला मिळतो . विद्यार्थ्यालाही ज्ञानी समजून हाक मारण्याचे हे उदाहरण दुर्मिळ आहे.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला . भास्कराचार्यांचे ज्ञान भांडार अधिक माहिती करून घेण्यासाठी जिज्ञासूंनी भास्कराचार्यांच्या लीलावती,बीज गणित ग्रंथाची इंग्रजी ,हिंदी,मराठी भाषांतरे वाचली पाहिजेत .
भारतीय गणिती वारसा पुढे आणण्याच्या उद्देशाने ‘अंक नाद ‘ अॅपने पुढाकार घेतल्याची माहिती मॅप एपिक कम्युनिकेशन्स् चे संचालक मंदार नामजोशी यांनी दिली. आद्य गणिती भास्कराचार्य यांच्या लीलावती या महान ग्रंथाच्या विवेचनाच्या माध्यमातून भारताला लाभलेला बुद्धिमत्तेचा वारसा रंजक पद्धतीने वेबिनार मालिकेतून उलगडत आहे. आतापर्यंत अंक नादच्या माध्यमातून गणितासंबंधी विविध विषयांवर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते,त्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला,असेही नामजोशी यांनी सांगितले.






