शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : देशभरातील तिरूपतीसारखी देवालये सुरू असताना शिर्डीसारखे देवालय कुलुपबंद आहे. मंदिर उघडण्यासाठी आतापर्यंत अनेक राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संघटनांनी आंदोलन करूनही यासंदर्भात सरकार दूर्लक्ष करत असल्याचा आरोप करत साईबाबा मंदिर सुरु न केल्यास भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे यांनी आंदोलनाचा इशारा सरकारला दिला आहे.
शासनाने लसीकरण झालेल्या तसेच कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक असलेल्या साईभक्तांना नियम व अटींच्या अधीन राहून साई दर्शन घेण्यास भाविकांना परवानगी द्यावी इतरत्र असलेल्या अनलॉकच्या नियमाप्रमाणे साईमंदिरही खुले करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. दरम्यान, पहिल्या लाटेनंतर मंदिर सुरू करण्यासाठी जशी तयारी करण्यात आली होती तशीच तयारी सध्या मंदिर प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे पुन्हा मंदिर सुरू होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
साईबाबा मंदिर बंद असल्याने शिर्डीसह पंचक्रोशीचं संपुर्ण अर्थकारण ठप्प झालं आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. बँकाकडून जप्तीच्या व वीज महामंडळाकडून वीज तोडणी कारवाई केली जात आहे. तर नगरपंचायतकडूनही करासाठी तगादा लावला जात असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. त्यामुळे मंदिर पुन्हा सुरू झाले तरच आर्थिक चक्र सुरू होऊन यातून सुटका होईल या अपेक्षेने व्यावसायिक मंदिर उघडण्याची मागणी करत आहेत.






