पोलिसकाकाने नव्या ठिकाणी रुजू होण्यापूर्वीच घेतला जगाचा निरोप…

पोलिस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येच्या घटनेने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

नगर (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक सदानंद काळे) : नगर जिल्हा पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. समाधान अच्युतराव भुतेकर (वय 33) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे नुकतेच त्यांच्या बदलीचे आदेश आले होते. मात्र, नव्या ठिकाणी रुजू होण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. यामुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येच्या घटनेने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, भुतेकर यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. समाधान भुतेकर यांचे मूळ गाव बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यात आहे. ते नगर जिल्हा पोलिस दलात भरती झाले होते.

पाच वर्षांपूर्वी भुतेकर यांची नगर शहर वाहतूक शाखेत नियुक्ती झाली होती. शहर वाहतूक शाखेतील पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची नुकतीच कोतवाली पोलिस ठाण्यात बदली झाली होती. शहर वाहतूक शाखेने त्यांना पाच ऑगस्टला निरोपही दिला होता. समाधान अच्युतराव भुतेकर लवकरच कोतवाली पोलिस ठाण्यात रुजू होणार होते. मात्र, गुरुवारी त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here