शिर्डीत ‘श्रावण सोहळ्या’त बालकलाकारांचा भक्तिमय नृत्य-संगीताविष्कार; रंगली साईभक्तीची सुरेल संध्या

शिर्डी

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : पवित्र श्रावण महिन्यानिमित्त शिर्डीतील सभामंडपात ‘श्री साई संगीत संगम’च्या वतीने आयोजित ‘श्रावण सोहळा’ भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात पार पडला. आध्यात्मिक गुरू डॉ. चंद्रभानु सतपथी यांच्या भक्तीरचनांवर देशभरातून आलेल्या बालकलाकार व नामवंत गायकांनी नृत्य-संगीताची अप्रतिम मैफल सजवली.

कार्यक्रमाचा प्रारंभ मानववंशशास्त्रज्ञ, संगीतकार व माजी क्रीडापटू डॉ. रमा चक्रवर्ती यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. वयाच्या ९० व्या वर्षीही त्यांनी रांची येथून उपस्थित राहून कलाकारांचा उत्साह वाढवला. साईसेवेत कार्यरत असलेल्या माधुरीताई शिंदे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती, तर तबलावादक प्राणेश यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमात तामिळनाडूच्या कांचीपुरम येथील ‘श्री कांची कलाक्षेत्र मंदिरा’च्या बालकलाकारांनी सादर केलेला नृत्याविष्कार मुख्य आकर्षण ठरला. व्ही. हर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली जे. योगलक्ष्मी, जे. जीविता, के. मोनिका, व्ही. व्ही. दिव्यश्री आणि एन. प्रज्ञा या चिमुकल्यांनी डॉ. सतपथी यांच्या रचनांवर उत्कृष्ट शास्त्रीय नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
तसेच शिर्डीतील ‘साई आश्रय परिवारा’च्या बालकलाकारांनी सादर केलेल्या सुश्राव्य भजनांनी सभागृहात चैतन्य निर्माण केले. चेन्नईच्या पार्श्वगायिका वैजयंती हरिश, संगीत दिग्दर्शक वीणू हरिश, शिर्डीच्या मौशुमी चक्रवर्ती आणि गुरुग्रामच्या रिचा तिवारी यांच्या सुरेल गायनाने सोहळ्यात रंगत आणली.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन गुरुग्रामच्या शालिनी श्रीवास्तव यांनी केले. संपूर्ण आयोजनाची धुरा मौशुमी चक्रवर्ती आणि एम. विवेकानंद यांनी सांभाळली. नृत्य, संगीत आणि भक्तीच्या या त्रिवेणी संगमाने साईभक्तांना मंत्रमुग्ध केले.शिर्डी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here