बुद्धिमान महाराष्ट्र घडविण्यासाठी सरकार पावले उचलेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

महाराष्ट्र

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) | महाराष्ट्रातील युवा पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्ञान, कौशल्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित अर्थात एमकेसीएलच्या रौप्यमहोत्सव पूर्ती आणि कृतज्ञता सोहळा रविवारी मुंबईत उत्साहात पार पडला. दि.२३ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे  या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

एमकेसीएलच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी या सोहळ्यात कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराला चालना देणाऱ्या दिशादर्शक कार्याबद्दल पद्मश्री प्रतापराव पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे माजी उच्च शिक्षण  मंत्री  राजेश टोपे, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि एमकेसीएलचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.
डॉ.भालचंद्र मुणगेकर,कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.व्ही.एल.माहेश्वरी,विलास शिंदे,डॉ.सी.डी.मायी,डॉ.अनंत सरदेशमुख,ओमजीवन गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.एमकेसीएल चे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे यांनी प्रास्ताविक करताना संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला.’राज्यात २ कोटी जणांनी एमएससीआयटी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.एमकेसीएल आता २५ हजार कर्मचाऱ्यांचे कुटुंब आहे. एआय ची १२५ टूल्स शिकवली जात आहेत आणि २५० डिजिटल कौशल्ये शिकवली जात आहेत.१७ राज्यात आणि परदेशातही संस्थेचा विस्तार झाला आहे’,अशी माहिती त्यांनी दिली. डॉ.रेवती नामजोशी यांनी सूत्रसंचालन केले.

रौप्यमहोत्सव पूर्ती सोहळ्यात एमकेसीएलच्या विविध नव्या उपक्रमांचे अनावरण करण्यात आले. ‘एमकेसीएल क्रांती’, ‘एआय असिस्टेड इंटर्नशिप फ्रेमवर्क’, ‘लर्न लाइव्ह’, ‘पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन ऍग्री आंत्रप्रेन्युअरशिप’, ‘महा एआय मास्टरक्लास’ आणि ‘व्हिजन डॉक्युमेंट फॉर हायब्रीड फ्युचर ऑफ हायर एज्युकेशन’ या उपक्रमांचा त्यात समावेश आहे.‘जीवघेण्या शेतीकडून समृद्ध शेतीकडे’ आणि ‘संगणक साक्षरतेकडून सार्थकतेकडे’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. इंडियन डिजिटल फाईन आर्टस् या उपक्रमाचे अनावरण तसेच एमकेसीएलच्या पेटंट्सची घोषणा यावेळी करण्यात आली.एमकेसीएल   ने तयार केलेल्या ‘हायब्रीड फ्युचर ऑफ हायर एज्युकेशन ‘(Hybrid Future of Higher Education )या व्हिजन डॉक्युमेंट चे आज प्रकाशन झाले.नॅशनल एज्युकेशन पॉलिसी (एनईपी ) ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ही महत्त्वाकांक्षी आणि अत्यावश्यक दिशा असल्याचे मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणाले.
महा एआय मास्टरलास (Maha AI Masterclass )या उपक्रमाचेही आज उद्घाटन झाले. एमकेसीएलच्या २५ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतानाच भविष्यातील डिजिटल शिक्षण, कौशल्यविकास आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील संस्थेच्या आगामी वाटचालीची दिशा या सोहळ्यात अधोरेखित करण्यात आली.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले,’एमकेसीएल ने आपला  नावलौकिक जगात वाढवला आहे.या सर्वाना मी अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो.त्यांनी राज्याच्या बाहेर सुद्धा काम केले.डिजिटल विश्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवले.डॉ.राम ताकवले,विजय भटकर,विवेक सावंत यांचेही योगदान महत्वाचे ठरले.या संस्थेचे योगदान विस्तारित स्वरूपाचे आहे.भारतासारख्या शेतीप्रधान देशात एआय आधारित तंत्र पोचले पाहिजे.एआय हा शब्द परवलीचा ठरावा.एआय शब्दाबद्दल औत्सुक्य आहे ,पुढे त्याबद्दल आस्था निर्माण व्हावी.ऊस,फळे,कडधान्ये उत्पादन वाढीमध्ये  उपयोग व्हावा.एमकेसीएल मध्ये सरकारची गुंतवणूक असली तरी वेळ पडली तर सरकारमध्ये गुंतवणूक करण्याची ताकद एमकेसीएल ने निर्माण करावी.एमकेसीएल ने राज्य संगणकसाक्षर करण्यात,प्रत्येक गावात  २५ वर्षे योगदान दिले आहे,ही मोठी गोष्ट आहे.एक मिशन म्हणून डॉ.राम ताकवले,विजय भटकर,विवेक सावंत यांनी योगदान दिले.कर्तृत्वसंपन्न असा वर्ग या संस्थेने निर्माण केला,याचा मनापासून आनंद आहे.हे काम पुढे चालू ठेवा आणि मोठे करा’.

ध्वनीचित्रफित संदेशाद्वारे शुभेच्छा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,’युवक आणि महिलांना सक्षम करण्यात एमकेसीएल ने योगदान दिले.संगणक प्रशिक्षकांना रोजगार दिला.व्यवसायाच्या संधी मिळाल्या.डिजिटल साक्षरतेचा ब्रँड घराघरात  तयार केला.एआय विषमता दूर करण्याचे मिशन हाती घेतले आहे.राज्यात लाखो युवक युवतीमध्ये  सक्षमता,सधनता आणि  आयुष्यभर शिकण्याची संस्कृती आली.पुढील २५ वर्षातील संस्थेचे संकल्पचित्र राज्यासाठी दूरदर्शी ठरणार आहे.हा रौप्य महोत्सव राज्याच्या डिजिटल परिवर्तनाचा,स्थानिक उद्योजकतेचा आणि ज्ञानाधिष्ठित विकासाचा  उत्सव आहे.राज्याला या क्षेत्रात पुढे नेण्यासाठी कोणतेही प्रस्ताव एमकेसीएल ने आणल्यास सरकार सक्षमतेने निर्णय घेईल.पुढील २५ वर्षासाठी एमकेसीएल ने मांडलेले ‘हायब्रीड फ्युचर ऑफ हायर एज्युकेशन इकोसिस्टिम ‘ हे संकल्पचित्र महत्वाकांक्षी आणि काळाची गरज ओळखणारे आहे.या संस्थेच्या माध्यमातून ज्ञानाधिष्ठित लर्नर्स तयार व्हावेत. डिजिटल विद्याधिष्टित महाराष्ट्राकडून एआय सक्षम विकसित महाराष्ट्राकडे आपली सामूहिक वाटचाल करायची  आहे.बाल वयोगटासाठी एमकेसीएल ने शासनासोबत ‘विकासघर’ हा पथदर्शी प्रकल्प कोल्हापुरातील करवीर येथे १०० जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरु केला आहे,त्याचा विस्तार राज्यभर करण्यासाठी,बुद्धिमान महाराष्ट्र घडविण्यासाठी सरकार पावले उचलेल.युवकांना ड्रीमर्स , ग्रीन एजर्स आणि एव्हरग्रीन लर्नर्स करू.प्रत्येक गाव उद्योजकतेच्या अर्थव्यवस्थेशी जोडू ‘.
प्रतापराव पवार यांनी ‘कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचे उपयोजन’ या विषयावर मार्गदर्शन केले. सत्काराला  उत्तर देताना प्रतापराव पवार  म्हणाले,’प्रशिक्षण,निधी आणि राजकीय इच्छाशक्ती नसेल तर कोणतेही तंत्रज्ञान यशस्वी होऊ शकणार नाही.एआय आधारित कृषी क्रांती ही जगाच्या पुढे राहण्यासाठी आहे.आम्ही त्यात मनपूर्वक काम करीत आहोत.कृषी क्षेत्रात एआय चा वापर वाढला तर ३० हजार कोटींचा युरिया ची आयात कमी होईल,परकीय चलन वाचेल, हाही फायदा कृषी मंत्रालयाला दिसत आहे.या तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार होण्याची गरज आहे.आगामी काळात  एआय मुळे कृषिक्षेत्रात चमत्कार घडून येतील.देशाचे अनेक प्रश्न सोडविण्यात मदत होईल.’
राजेश टोपे म्हणाले,’एमकेसीएल मध्ये आम्ही कधी राजकारण येऊ दिले नाही.चांगल्या संस्था वाढल्या पाहिजेत,हा शरद पवार यांचा विचार घेऊन आम्ही योगदान दिले,राज्याला डिजिटल साक्षर केले.भविष्याची पावले ओळखून काम केले पाहिजे.समाजातील सर्व घटकांना या संस्थेने प्रगतीचा स्पर्श केला आहे.डिजिटल क्षेत्रातील विषमता दूर करण्याचे काम एमकेसीएल ने केले आहे. ‘
डॉ.विवेक सावंत यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगताना एमकेसीएल चा भविष्य लेख मांडला.ए आय आधारित कृषी चा उपयोग सांगताना ते म्हणाले,’एआय मुळे कृषी उत्पादने वाढली,साखर उत्पादन वाढले तर मौल्यवान परकीय चलन वाचेल.शरद पवार यांनी त्यांच्या कल्पनांना मूर्त स्वरूपात आणण्यासाठी संस्था स्थापन केल्या,पण तिथे स्वतः मूर्ती बनून न राहता स्फूर्ती बनून राहिले’.’एम के सी एल ने तंत्रज्ञान हस्तांतरण क्षेत्रातील ग्लोबल लीडर व्हावे,अशी अपेक्षा कुलगुरू माहेश्वरी यांनी व्यक्त केली.

अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ.अनिल काकोडकर म्हणाले,’२५ व्या वर्षात एमकेसीएलची वाटचाल जेन झी कडे झाली आहे. यापुढे जेन अल्फा कडे लक्ष द्यायचे आहेत. एमकेसीएल ची वाटचाल नेमकी त्याच दिशेने आहे.हे नाते बळकट होत राहावे.तंत्रज्ञाना द्वारे  स्थायी योगदान संस्थेने देत राहावे.उपयुक्त मानव घडवून जगाचे प्रश्न सोडविण्याचा कार्यक्रम संस्थेसमोर आहे.हे ध्येय गाठले जाईल,याची खात्री आहे.’
दुपारच्या सत्रात ‘बिल्ड एआय’ या विषयावर परिसंवाद झाला. नीलेश मोडक, चिन्मय गवाणकर आणि डॉ. आशीष तेंडुलकर यांच्याशी विनायक पाचलग यांनी संवाद साधला. डॉ. अजित रानडे यांनी परिसंवादाचे अध्यक्षस्थान भूषविले. तिसऱ्या सत्रात विविध मान्यवरांची मनोगते आणि एमकेसीएलच्या नव्या उत्पादनांचे अनावरण करण्यात आले.
२० ऑगस्ट २००१ रोजी स्थापन झालेल्या एमकेसीएलने गेल्या २५ वर्षांत महाराष्ट्रातील डिजिटल शिक्षण आणि कौशल्यविकासाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. एमएस-सीआयटीसह विविध डिजिटल शिक्षण उपक्रम आणि कौशल्यविकास कार्यक्रमांच्या माध्यमातून संस्थेने राज्यातील लाखो विद्यार्थ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान पोहोचविले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात उभारण्यात आलेल्या सुमारे ३६०० ई-प्रशिक्षण केंद्रांद्वारे दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचा लाभ मिळत आहे.
रौप्यमहोत्सवी वाटचालीच्या निमित्ताने एमकेसीएलने पुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल शिक्षण, कौशल्यविकास आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ज्ञानाधारित विकासाला अधिक गती देण्याचा संकल्प व्यक्त केला. गेल्या २५ वर्षांच्या कार्याचा अनुभव आणि भविष्यातील तंत्रज्ञानातील बदल यांची सांगड घालत महाराष्ट्राला ज्ञानाधारित आणि तंत्रज्ञानसक्षम बनविण्याच्या दिशेने एमकेसीएलची पुढील वाटचाल राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here