मुंबई(कुलाबा) (प्रमिला जाधव) – श्रावण महिना सुरु झाला कि चाहूल लागते ती विविध सणांची. त्यातीलच एक विशेष आणि पवित्र सण म्हणून ओळखला जाणारा भाऊ आणि बहिणीचा प्रेमाचा आणि आणि रक्षणाचा प्रतीक असलेला रक्षाबंधन हा सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपल्याने भायखळ्यातील राखी बाजार निरनिराळ्या आणि मनमोहक राख्यांनी सजलेला आहे. लहानापासून ते मोठ्या लोकांसाठी विशिष्ट प्रकारच्या राख्या बाजारामध्ये दाखल झाल्या आहेत. यंदा बाजारामध्ये कोरोनामुळे राख्यांची मागणी कमी झाली असून राख्यांच्या किमतीमध्ये 20 ते 30 टक्क्याची वाढ झाली आहे. बाजारामध्ये 10 रुपयापासून ते 200 रुपयापर्यंत राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. भायखळ्यातील होलसेल राखी बाजार हा अत्यंत प्रसिद्ध असून लांब लांबून ग्राहक इथे राखी खरेदी करण्यासाठी येत असतात. लहान मुलांसाठी तेथे सध्या फेमस असलेल्या शक्तिमान, बाहुबली , बाल गणेश, छोटा भीम,हनुमान, वर्ल्ड कप, मिकी माउस आणि लाईटच्या राख्या या सारख्या अनेक प्रकारच्या राख्या येथे उपलब्ध असून त्यांना प्रचंड मागणी आहे. तसेच होलसेल बाजार असल्यामुळे इतर ठिकाणाहून ह्या बनवलेल्या राख्यांची किमत फार कमी आहे. बाजारामध्ये जरीची राखी, चंदन राखी, मोती राखी, गोंडा राखी आणि नाण्याची राखी या नवीन प्रकारच्या राख्या मोठ्या प्रमाणत दिसत असून या राख्यांची मागणी या वर्षी कमी झाली असून त्यांची किमत 30 ते 70 रुपयांपर्यंत आहे. तसेच बाजारामध्ये गोंड्याच्या राख्या, राम राख्या, फुलांच्या राख्या, स्टीलच्या राख्या या पारंपारिक आणि विविध जुन्या प्रकारच्या राख्या आजही या राखी बाजारात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. बाजारात वेगळ्या सुवर्ण राखी आल्या असून या राखीवर गणेश, लक्ष्मी देवतेचे फोटो असून ह्या राखीला सुवर्ण रंग दिल्यामुळे ह्या राखी ग्राहकांचे लक्ष्य वेधून घेत आहेते ह्या राख्याची होलसेल किमत 80 ते 250 रुपयापर्यंत आहे.भायखळ्यातील राखी बनवणे हा फार पूर्वी पासून येथील स्थानिक नागरिकांचा व्यवसाय आहे. येथे वर्षाचे 12 हि महिने राखी बनवण्याचे काम चालते.परंतु या कोरोना रोगामुळे यंदा हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात ठप्प पडला आहे. त्यामुळे गिर्हाईक देखील राखी खरेदीसाठी बाहेर पडत नसल्याची माहिती राख्याचे स्थानिक होलसेल विक्रेते बबलु मिश्रा यांनी दिली.







