नवी दिल्ली: टोकियो ऑलिंम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावल्यानंतर देशभरातून नीरज चोप्रावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सन्मान स्वीकारत पदक जिंकल्यानंतर दहा दिवसांनी मंगळवारी नीरज पानिपतला पोहचला. मात्र खंडरा येथील कार्यक्रमादरम्यान तब्येत बिघडल्याने नीरजला रुग्णालयात नेण्यात आले आहे.
याबाबत समजलेल्या वृत्तानुसार, नीरजची तब्येत बिघडल्यानंतर त्याच्या कुटुंबाने त्याला रुग्णालयात नेले. नीरजला याआधी तीन दिवसांपासून ताप होता, परंतु त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. ताप असण्यासोबत नीरजचा घसाही खवखवत आहे.
खंडरा येथील कार्यक्रमस्थळी प्रचंड गर्दी असल्याने कार्यक्रम लवकर संपवण्यात आला. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे, हरयाणा सरकारने शुक्रवारी आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात नीरज भाग घेऊ शकला नाही. तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात जोडला गेला.






