माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून समाजासाठी संस्थात्मक कार्य उभे रहावे – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

मुधोजी हायस्कूलच्या गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा सत्कार

मुंबई (महाराष्ट्र संपादक सुनिल पाटील) : फलटण एज्युकेशन सोसायटी आणि मुधोजी हायस्कूल यांचे शिक्षण प्रसाराचे कार्य शंभरपेक्षा अधिक वर्षापासून अव्याहतपणे सुरु आहे. शालांत परीक्षा १९९० तुकडीच्या उल्लेखनीय कार्यातून सर्वं माजी विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन माजी विद्यार्थी संघटनेची उभारणी करावी, अशा संस्थात्मक कार्य उभारणीतून नव्या पिढीचे भविष्य घडविले जावे, संकटग्रस्तांचे अश्रू पुसले जावेत आणि गरजवंताना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती श्री.रामराजे नाईक- निंबाळकर यांनी व्यक्त केली.

विधानभवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती, श्री.रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या शुभहस्ते मुधोजी हायस्कूल, तालुका फलटण जि. सातारा येथील १९९० च्या इयत्ता १० वी तुकडीच्या माजी विद्यार्थ्यांच्या संस्थेने, आपापल्या क्षेत्रात उच्चपदावर पोहोचलेल्या सह-अध्यायींचा सत्कार आयोजित केला. त्याप्रसंगी सत्कारमूर्ती आणि उपस्थितांना संबोधित करतांना सभापती श्री.रामराजे नाईक- निंबाळकर बोलत होते. विधानभवनातील, मध्यवर्ती सभागृहात आयोजित या कौटुंबिक परंतु आगळ्यावेगळ्या समारंभामुळे उपस्थित फलटणकरांसह सर्वांच्याच मनात आनंदाचा ठेवा बनून राहिलेल्या शालेय जीवनातील स्मृतींना उजाळा मिळाला.ramraje-nimbalkar

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचेहस्ते कोरोना योध्दा पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सौ.सुजाता खाडे-ढोले, मुंबई उच्च न्यायालयात वकीलीची २३ वर्षे पूर्ण केलेले ॲडव्होकेट विश्वनाथ टाळकुटे, तसेच श्रीमती विजया गाडे-सांगळे यांचे सुपुत्र आणि भारतातील पहिला विगन टेनिसपटू श्री.विश्वजित सांगळे यांचा ‘स्नेहदर्पण’ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्कारमूर्तींना शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव श्री.राजेन्द्र भागवत, मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त श्री.दिलीप ढोले, निवृत्त सह सचिव श्री.भाई मयेकर, माऊली फाऊंडेशन काळबादेवीचे अध्यक्ष डॉ.सिंगन, श्री.मोहन भोसले, श्री.प्रसन्न रुद्रवते, श्री.महेंद्र काज, साठे व रुईया कॉलेजचे प्राध्यापक श्री.चंद्रशेखर नेने, श्री.मनोज माने समारंभास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या समारंभामुळे समाजकार्यांत आणखी मोठे योगदान देण्याची प्रेरणा आणि बळ आम्हांला प्राप्त झाले अशी भावना सत्कारमूर्तींनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास नसीर शिकलगार, असीम तांबोळी, अमोल जोशी, मनिष निंबाळकर, किरण गोरे, शर्मिला चव्हाण, वि.स.पागे., संसदीय प्रशिक्षण केंद्र, संचालक निलेश मदाने, संजय खानोलकर यांचेसह मुधोजी हायस्कूल फलटणचे माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती दीपाली मनिष निंबाळकर,गौरवपत्राचे वाचन श्रीमती शितल साळे आणि आभारप्रदर्शन श्रीमती श्रध्दा सांगळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here