कोहिनूर वाहनतळातील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : मुंबई महानगरपालिकेच्या कोहिनूर वाहनतळातील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे उदघाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर झाल्यानंतर या धोरणास उत्तम प्रतिसाद मिळत असून चार्जिंग स्टेशन्स आणखी वाढविण्याची सूचना श्री ठाकरे यांनी केली. आमदार सदा सरवणकर, मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यावेळी उपस्थित होते.

पर्यावरण मंत्री श्री ठाकरे म्हणाले, वातावरणीय बदलाच्या आणि वाढत्या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने मागील महिन्यात शासनाचे इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर झाले. या धोरणास उत्तम प्रतिसाद मिळत असून शासनामार्फत पर्यावरणपुरक विविध धोरणे आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मुंबईचे पहिले एकात्मिक सार्वजनिक वाहनतळ असलेल्या दादरमधील कोहिनूर वाहनतळात विविध सुविधांसह आशुतोष एन्टरप्राइजेसच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या या वाहनतळात चार डीसी आणि तीन एसी अशा दोन प्रकारचे सात चार्जर बसविण्यात आले आहेत. याद्वारे २४ तासात सुमारे ७२ वाहने चार्ज होऊ शकतील. यामध्ये दोन चाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांचा समावेश असेल. नागरिक ऑटोपार्क मोबाईल अँपद्वारे ऑनलाइन पार्किंग बुक आणि आरक्षित करू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here