अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) : पेण भाऊसाहेब नेने महाविद्यालयाच्या सभागृहात डॉ. तुकाराम माळवे लिखित “तुका म्हणे ” पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संस्थेचे आधारस्तंभ ॲड. बापूसाहेब नेने यांच्या हस्ते करण्यात आला होता.प्रास्ताविक डॉ. माळवे सर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष स्थानी अँड. बापूसाहेब नेने,तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. सदानंद धारप ,डॉ. तुकाराम माळवे ,ॲड.मंगेश नेने ,ओक साहेब ,संजय कडू साहेब ,किसन माळवे( द्राक्ष बागायतदार) यावेळी उपस्थित होते.
यावेळी बापूसाहेब नेने अध्यक्षिय भाषणात म्हणाले की ‘तुका म्हणे’ ..या पुस्तकात डॉ. तुकाराम माळवे यांनी आपल्या सग्यासोयऱ्यांचा आलेख मांडला आहे. त्यांची आई अडाणी असतांना सुध्दा आपली मुले शिकावीत अशी त्यांची तीव्र इच्छा होती. तिचीच प्रेरणा घेऊन डॉ. तुकाराम माळवे पेणच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत . अशीच त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या पिढीचा इतिहास मांडण्यात आला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धारप म्हणाले कि, महाविद्यालयात पहिल्यांदाच डॉ. माळवे सरांनी आत्मचरित्र लिहिले आहे आणि ते खरोखरच आपल्यासाठी प्रेरणादायी आहे असंच त्यांनी पुढेही लिहीत राहावे असे मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
माजी प्राचार्य पोरे सर यांनी हे पुस्तक वाचले तसेच “तुका म्हणे”हे पुस्तक भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल आणि सर्वानी आवर्जून हे पुस्तक वाचावे या वेळी सांगितले. तसेच पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मंगेशजी नेने म्हणाले कि, माळवे कुटुंबाबद्दल लिहिलेले हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल पण त्याचबरोबर नेने कुटुंब व माळवे कुटुंब यांचे ऋणानुबंध गेल्या 28 वर्षापासून आहेत आणि त्यांनी जपून ठेवले आहेत. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास या आत्मकथाना मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच डॉ. तुकाराम माळवे यांनी “तुका म्हणे” हे पुस्तक लिहिण्यासाठी दहा वर्षे लागली त्यात अनेक खाचखळगे आले. आज 75 व्या स्वातंत्र्यदिनी पूर्ण झाले असून आज रोजी पुस्तक प्रकाशित झाले याचा मला आनंद झाला असे यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमासाठी माळवे कुटुंबीय, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व मित्रमंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गिरीश उपाध्ये यांनी केले पुस्तक प्रकाशित झाल्यावर सर्वांनी माळवे कुटुंब व डॉ.माळवे यांचे अभिनंदन केले.कार्यक्रमात पाहुण्याचे आभार अँड. शोभा माळवे यांनी मानले.






