प्रवाशांनी टाकलेले खाद्य पदार्थ घेत आहेत प्राण्यांचे जीव, वनविभाची मात्र बेशिस्त प्रवाशांवर कारवाईत कमी पडत आहेत.
अलिबाग-सोगावकर : दि.२१ऑगस्ट, रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये प्राणी सुरक्षित नसल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.
अभयारण्यातील प्राण्यांच्या सुरक्षेसाठी करोडो रुपये खर्च करून मुंबई – गोवा महामार्गावर प्राणी येणार नाही यासाठी महामार्गाच्या दुतर्फा प्रतीबंधात्मक उपाय योजना म्हणून साऊंड ब्रेकर वाल, मंकी ग्रॅडर तयार केले आहेत. परंतु ह्या उपाययोजना तांत्रिकदृष्ट्या फोल ठरल्या असून पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्गावर अपघातात मुक्या प्राण्यांच्या जीवाशी खेळ होत आहे.
शनिवारी २१ऑगस्ट रोजी दुपारी १२:३० वाजेदरम्यान अशीच घटना कर्नाळा अभयारण्य परिसरात मुंबई-गोवा महामार्गावर घडली असून, एका अज्ञात वाहनाने माकडाला धडक देऊन निघून गेला,यामध्ये माकड गंभीर जखमी होऊन रस्त्याच्या मधोमध पडून होते,याच दरम्यान पनवेल कडून पेणच्या दिशेने येत असलेले सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी पाहिल्यानंतर स्वतः थांबून माकडाला रस्त्याच्या कडेला नेले आणि तात्काळ वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण व वनपाल अंबाजी यांना फोन केला, परंतू फोन न लागल्याने शेवटी ठाकूर कर्नाळा अभयारण्याच्या कार्यालयात गेले असता वन परिक्षेत्र अधिकारी उपलब्ध नसल्याचे समजले, त्यांनंतर तेथे उपलब्ध असलेले वन रक्षक राठोड यांना तात्काळ जखमी माकडावर उपचार करण्याची विनंती केली असता,सदर जखमी माकडाला पकडण्यासाठीचे साहित्य नसल्याचे सांगितल्याने कर्नाळा अभयारण्यातच प्राणी सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होत आहे.
वन्य प्राण्यांना वाचविणे हे सर्वांचे काम असून ती आपली जबाबदारी आहे. त्यासाठी प्रवाश्यांना सूचना केली जाते की वन्य प्राण्यांना खाऊ देऊ नये.असे केल्याने प्राणी वारंवार रस्त्यावर येतील, त्यामुळे प्राण्यांच्या अपघातात वाढ होत आहेत,तरी त्वरित वन विभागाने या बाबींकडे लक्ष देण्याची व प्राण्यांना खाऊ देणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी होत आहे.
वनविभागाने महामार्गावर जे प्रवासी प्राण्यांसाठी खाद्यपदार्थ टाकतात त्या प्रवाशांवर कारवाई करण्याची वारंवार मागणी होत असतानाही कर्नाळा अभयारण्य वनपरिक्षेत्र अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळेच अभयारण्यातील प्राण्यांना आपला जीव गमवावा लागत आहे,असे संतोष ठाकूर सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितले.






