सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात नेत्यांच्या मुलांची सुरक्षा वाढली आणि जनता मात्र असुरक्षित असल्याचा टोला भाजपचे महाराष्ट्र विधानसभेचे मुख्य प्रतोद तथा माजी मंत्री आशीष शेलार यांनी ठाकरे सरकारला सोलापुरात लगावला.
कोरोना नियम पाळून दहीहंडीला परवानगी न दिल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. आज आणि उद्या असे दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर आलेल्या आशीष शेलार यांचे भाजपच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज चौकात जल्लोषात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले.
शेलार म्हणाले, सरकारचा पोलिसांवर वचक नसल्यामुळेच लोक सुरक्षित नाहीत. नेत्यांच्या मुलांची सुरक्षा वाढली असून जनतेची सुरक्षा कमी केली आहे. कायदा व सुव्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. गोविंदा उत्सवाबाबत ते म्हणाले, मुख्यमंत्री आज झूमद्वारे बैठक घेत आहेत. ज्यांचे दोन लस डोस झाले, त्यांना जास्त उंच नाही व शहरभर नसलेले दहीहंडीचे कार्यक्रम घेण्यास परवानगी द्यावी. दहीकाल्यास सरकारने परवानगी न दिल्यास आंदोलन करू असेही ते म्हणाले.






