पंढरपुरात २३ जुलै रोजी ‘श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा’; वारकरी मल्लांसाठी अभिनव व प्रेरणादायी आयोजन

कुस्ती महावीर स्पर्धा

पंढरपूर  (रिपार्टर प्रकाश इंगोले) विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. २३ जुलै २०२६ रोजी वाखरी (पंढरपूर) येथे श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वारकरी संप्रदायातील मल्लांसाठी हा एक अत्यंत अभिनव उपक्रम असून, याद्वारे महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेला व कुस्ती खेळाला मोठे प्रोत्साहन मिळणार आहे. या स्पर्धा दिनांक: २३ जुलै २०२६ दुपारी १:३० वाजता  पालखी तळाच्या शेजारी, विश्वशांती गुरुकुल परिसर, वाखरी, पंढरपूर येथे होणार आहेत.

स्पर्धेला उद्घाटक व प्रमुख पाहुणे: संत साहित्याचे गाढे अभ्यासक व उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हासदादा पवार, हिंद केसरी दिनानाथ सिंग, आणि डबल महाराष्ट्र केसरी पै. हर्षवर्धन सदगीर, आमदार समाधान आवताडे, महाराष्ट्र केसरी पै. आप्पासाहेब कदम आणि महाराष्ट्र केसरी पै. विष्णूतात्या जोशीलकर यांची विशेष उपस्थिती असणार आहेत तर अध्यक्ष म्हणून श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीचे कार्याध्यक्ष, विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड  हे उपस्थित राहणार आहेत.

माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड तसेच स्पर्धेचे संयोजन समितीचे सचिव प्रा. विलास कथुरे यांनी सर्व वारकरी मल्लांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

या स्पर्धेत विविध वयोगटांनुसार रोख रकमेची बक्षिसे आणि पदके दिली जाणार आहेत. तसेच विजेत्यांना पदके, मानाचा फेटा, माऊलींची/जगद्गुरुंची प्रतिमा, शाल, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरवण्यात येईल.

योगमहर्षी वै. रामचंद्र गोपाळ शेलार (शेलारमामा) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तंदुरुस्त अशा ७० वर्षे वयाच्यापुढील ज्येष्ठ मल्लांसाठी याच दिवशी आगळी-वेगळी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच १६ ते २५ वयोगटातील विजेत्यास – ‘कुमार वारकरी कुस्ती महावीर’, ५६ ते ६५ वयोगटातील विजेत्यास – ‘वारकरी कुस्ती महावीर’,  ७० वर्षांच्या पुढील विजेत्यास – ‘ज्येष्ठ वारकरी कुस्ती महावीर’ पुरस्कार प्रदान केला जाईल.

स्पर्धेसाठी नोंदणीकरिता २३ जुलै २०२६ रोजी सकाळी ७:३० वाजता, विश्वशांती गुरुकुलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ संपर्क साधावा. यावेळी  वयाच्या पुराव्यासाठी ओळखपत्र सोबत ठेवावे.

महाराष्ट्रातील लोककलेला संजीवनी देण्यासाठी याच दिवशी रात्री ८:०० ते ११:०० वाजेपर्यंत वारकऱ्यांना अत्यंत प्रिय असलेल्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या प्रसिद्ध भारुडे व गवळणींच्या स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here