पंढरपूर आरटीओ कॅम्पमधील लायसन्स बुकिंग मर्यादा पूर्ववत २४० करावी. नगराध्यक्षा डॉ. प्रणिताताई भालके

लायसन्स

पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) |  तालुक्यातील नागरिकांना वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पंढरपूर आरटीओ कॅम्पमधील कच्चे व पक्के लायसन्ससाठी असलेली ऑनलाइन बुकिंगची मर्यादा पूर्वीप्रमाणे २४० इतकी करण्यात यावी, अशी मागणी पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रणिताताई भगीरथ भालके यांनी राज्याचे परिवहन मंत्री ना.प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.

 

पंढरपूर येथे आरटीओ कॅम्पच्या माध्यमातून कच्चे व पक्के लायसन्ससाठी नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिली जाते. यापूर्वी या कॅम्पमध्ये ऑनलाइन बुकिंगसाठी २४० जागांची मर्यादा उपलब्ध होती. मात्र, सध्या आरटीओ विभागाकडून बुकिंग क्षमतेत कपात करण्यात आली असून कच्च्या लायसन्ससाठी ७२ आणि पक्क्या लायसन्ससाठी १२० जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पंढरपूर तालुक्याची लोकसंख्या सुमारे चार लाखांच्या आसपास असून वाहनांची संख्या आणि लायसन्स काढणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत सध्याची बुकिंग मर्यादा अपुरी पडत असल्याने नागरिकांना लायसन्ससाठी ऑनलाइन स्लॉट मिळविताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक नागरिकांना वारंवार ऑनलाइन बुकिंग करण्याचा प्रयत्न करूनही अपेक्षित वेळेत स्लॉट उपलब्ध होत नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे.लायसन्सची प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यास नागरिकांना वाहन चालविताना कायदेशीर कारवाईचा सामना करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आरटीओ कॅम्पची बुकिंग क्षमता वाढविणे गरजेचे असल्याचे नगराध्यक्षा डॉ. प्रणिताताई भालके यांनी पत्रात नमूद केले आहे.

याबाबत संबंधित विभागास आवश्यक आदेश देऊन पंढरपूर आरटीओ कॅम्पमधील बुकिंग क्षमता पूर्ववत वाढवावी, जेणेकरून लायसन्ससाठी प्रतीक्षा करणाऱ्या हजारो नागरिकांना दिलासा मिळेल आणि त्यांची होणारी गैरसोय दूर होईल, अशी विनंती त्यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here