पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) | आषाढी वारी २०२६ च्या परतीच्या प्रवासादरम्यान लाखो वारकऱ्यांची सुरक्षितता अबाधित राहावी आणि शतकानुशतके सुरू असलेली वाखरी येथील पालखी मुक्कामाची परंपरा कायम राहावी, यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) वाखरी येथील रखडलेल्या सर्व्हिस रोडचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले असून, यामुळे परतीच्या वारीतील वारकऱ्यांसाठी सुरक्षित व सुलभ मार्ग उपलब्ध झाला आहे.
आषाढी वारीदरम्यान वाखरी येथे प्रत्यक्ष भेट देऊन खासदार प्रणिती शिंदे यांनी पालखी मुक्काम स्थळाची पाहणी केली होती. यावेळी राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे वाखरी गावाकडे जाणारा मूळ रस्ता बंद झाला होता. त्यामुळे आषाढी एकादशीनंतर परतीच्या प्रवासाला निघणाऱ्या पालख्या, दिंड्या आणि लाखो वारकऱ्यांना वाखरी येथील पहिल्या मुक्कामासाठी पोहोचताना मोठ्या अपघाताचा आणि अडचणींचा सामना करावा लागण्याची भीती निर्माण झाली होती.
धार्मिक परंपरेचे महत्त्व आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन खासदार प्रणिती शिंदे यांनी तातडीने पावले उचलली त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) पंढरपूर येथील प्रकल्प अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा करून परिस्थितीचे गांभीर्य पटवून दिले. प्रकल्प संचालकांना लेखी निवेदन सादर करून, वारी परतीच्या प्रवासाला लागण्यापूर्वी अवघ्या सात दिवसांत हे सर्व्हिस रोडचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली होती.
आषाढी एकादशीनंतर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचा परतीचा पहिला मुक्काम वाखरी येथेच होतो. ही ऐतिहासिक परंपरा खंडित होऊ नये आणि भरधाव वाहनांमुळे वारकऱ्यांना धोका निर्माण होऊ नये, याकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते.खासदार प्रणिती शिंदे यांच्या आक्रमक आणि सकारात्मक पाठपुराव्याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) तातडीने यंत्रणा हलवली आणि वाखरी येथील सर्व्हिस रोडचे काम वेळेत पूर्ण केले.
लाखो वारकरी, दिंड्या आणि पालख्या आता हायवेवरील भरधाव वाहनांच्या धोक्याशिवाय सुरक्षितपणे वाखरी गावात प्रवेश करू शकतील. परंपरागत पालखी मुक्कामाची अखंड परंपरा यामुळे कोणत्याही अडथळ्याविना पार पडणार आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून हे काम वेळेत पूर्ण करून घेतल्याबद्दल वारकरी संप्रदाय, भाविक आणि वाखरी येथील स्थानिक नागरिकांमधून खासदार प्रणिती शिंदे यांचे विशेष आभार मानले जात असून, मोठे समाधान व्यक्त होत आहे.







