जगविख्यात समाजशास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्वेट यांचे निधन

सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या व धोरण समितीच्या सदस्या, बुध्द, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या व स्त्री-मुक्तीवादी विचार, संत साहित्य आणि वारकरी तत्वज्ञानाची अभ्यासपूर्ण अशी नव्या पद्धतीची मांडणी करून समाजापुढे आणणाऱ्या जेष्ठ संशोधक -लेखिका, स्त्री मुक्ती चळवळ आणि परित्यक्ता स्त्रियांची चळवळ, आदिवासी चळवळीमध्ये पायाला भिंगरी लावून काम करणाऱ्या विचारवंत, कार्यकर्त्या डॉ. गेल ऑम्वेट उर्फ शलाका पाटणकर यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

गुरुवारी (दि.२६) सकाळी १० कासेगाव ( जि. सांगली) येथे क्रांतिवीर बाबूजी पाटणकर संस्थेच्या आवारामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.डॉ. गेल या मूळच्या अमेरिकेच्या असल्या तरी त्या तेथे विद्यार्थी दशेपासूनच वेगवेगळ्या चळवळीमध्ये सक्रिय होत्या. अमेरिकेच्या साम्राज्यवादी युद्धखोर प्रवृत्तीविरोधी उभ्या राहिलेल्या तरुणाईच्या चळवळीत त्या अग्रस्थानी होत्या.

कोण होत्या डॉ.गेल आम्वेट
अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर त्या भारतात आल्या. वेगवेगळ्या चळवळींचा अभ्यास करत असताना त्या महाराष्ट्रात आल्या आणि महात्मा फुले यांनी केलेल्या संघर्षाला आपलेसे केले. महात्मा फुले यांच्या चळवळीवरच त्यांनी वसाहतीक समाजातील सांस्कृतिक बंड (नॉन ब्राम्हिण मूहमेन्ट इन वेस्टर्न इंडिया ) हा आपला पीएचडी प्रबंध अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठात सादर करून डॉक्टरेट पदवी संपादन केली.

त्यांचा हा प्रबंध भारतातच नव्हे तर जगभरात अभ्यासकांना मैलाचा दगड ठरला आहे. त्यांच्या या पुस्तकामुळे फुलेंची चळवळ पुन्हा नव्याने अधोरेखित झाली. या पुस्तकामुळेच प्रभावित होऊन बहुजन समाज पार्टीचे संस्थापक दिवंगत कांशीराम कासेगाव येथे येऊन त्यांचे मार्गदर्शन व सल्ला घेत असत.

डॉ. गेल यांनी अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राच्या मोहात न अडकता भारतात विशेषतः महाराष्ट्रात राहण्याचा निर्णय घेतला. स्री-मुक्ती चळवळींचा अभ्यास करत असतानाच क्रांतीविरांगना इंदूताई पाटणकर यांची भेट झाली आणि एमडीचे शिक्षण अर्धवट सोडून पूर्णवेळ चळवळीत काम करण्याचा निर्णय घेतलेल्या डॉ. भारत पाटणकर यांना जीवनसाथी म्हणून निवडले.

डॉ. गेल यांची प्रामुख्याने कल्चरल रीवोल्ट इन कोलोनियल सोसायटी- द नॉन ब्राम्हीण मुहमेन्ट इन वेस्टर्न इंडिया, सिकिंग बेगमपुरा, बुद्धिझम इन इंडिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा फुले, दलित अँड द डेमॉक्रॅटिक रिव्ह्यूलेशन, अंडरस्टँडिंग कास्ट, वुई विल स्मॅश दी प्रिझन, न्यू सोशल मुमेन्ट इन इंडिया यांचा समावेश आहे.

डॉ. गेल यांनी देश आणि परदेशात अनेक संशोधन पेपर सादर केले असून शेकडो व्याख्याने दिली आहेत. त्यांना अनेक पुरस्कार ही मिळाले आहेत. त्यांची मुलगी प्राची , जावई तेजस्वी, नात निया हे सध्या अमेरिकेमध्ये वास्थव्यास असून ते तेथे वेगवेगळ्या चळवळीत सहभागी असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here