नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने (सीबीएसई) घेण्यात येणारी दहावी-बारावीची फेरपरीक्षा उद्या 25 ऑगस्टपासून देशभरात ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. सीबीएसई बोर्डाचे खासगी विद्यार्थी तसेच जुलै महिन्यात अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर झालेल्या निकालावर असमाधानी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा होत आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा माहिती-तंत्रज्ञानाच्या पेपरने सुरू होणार असून गणिताचा पेपर शेवटचा असणार आहे. दुसरीकडे बारावीच्या विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषयाचा पहिली पेपर असणार असून होम सायन्सचा शेवटचा पेपर असणार आहे. 15 सप्टेंबरपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार आहे. या परीक्षांचा निकाल 30 सप्टेंबरपर्यंत लागण्याची चिन्हे आहेत. कोरोना काळात या परीक्षा ऑफलाइन होणार असल्याने परीक्षा पेंद्रावर कोरोना प्रतिबंध नियमांचे पालन करण्याच्या सूचना सीबीएसई बोर्डाने जाहीर केल्या आहेत. परीक्षा पेंद्रावर येताना विद्यार्थ्यांसोबत हॉलतिकीट असणे आवश्यक आहे. हॉलतिकिटाशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळणार नाही.
परीक्षा केंद्रावर प्रवेश केल्यानंतर विद्यार्थ्यांनी मास्क लावणे तसेच ठरावीक काळानंतर सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य आहे. तसेच परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी स्वतच्याच वस्तूंचा वापर करावा. कोणत्याही वस्तूंची देवाणघेवाण इतर विद्यार्थ्यांसोबत करू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच नोंदणी करूनही या ऑफलाइन परीक्षेला विद्यार्थी गैरहजर राहिल्यास अंतर्गत मूल्यमापन धोरणानुसार मिळालेले गुण अंतिम मानले जाणार आहेत.






