फुरसुंगी व उरुळी देवाची प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती द्यावी – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी व उरुळी देवाची प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

फुरसुंगी व उरुळी देवाची प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून उर्वरित योजना पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी पुणे महानगरपालिकेकडून उपलब्ध करून घ्यावा. या योजनेची नोंद आयएमआयएस प्रणालीवर नसल्यामुळे योजनेसाठी सद्यस्थितीत निधी उपलब्ध होत नाही. यासंदर्भात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित कार्यवाही करावी असे निर्देशही श्री.पाटील यांनी यावेळी दिले.

फुरसुंगी नळपाणी पुरवठा योजनाअंतर्गत गुरुत्व नलिका वितरण व्यवस्था टाकून झाल्यानंतर रोड पूर्ववत करून देण्यासाठी निधी उपलब्ध करणे, नळपाणी पुरवठा योजनेचा रोड पूर्ववत करावयाच्या खर्चासह वाढीव खर्च पुणे महानगरपालिकेकडून घेणे, मंजूर योजनेतील पुणे महानगरपालिकेच्या हिस्स्यापैकी २२६ लक्ष रुपये पुणे महानगरपालिकेने त्वरित उपलब्ध करून देण्याबाबतही या बैठकीत निर्देश देण्यात आले.

यावेळी माजी मंत्री विजय शिवतारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर, पाणीपुरवठा विभागाचे सहसचिव प्रवीण पुरी, मुख्य अभियंता श्री. भुजबळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुणे, कार्यकारी अभियंता वैशाली आवटे तसेच पुणे महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here