नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि कुबेर जाधव) : कसमादे पट्ट्यातील शेतकरी सातत्याने शेतीत नवनवे प्रयोग करण्याबाबत आघाडीवर असतो. वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून जास्त उत्पादन घेण्यासोबत सहकारी शेतकऱ्यांनाही सोबत घेऊन चालण्याची त्यांची वृ्त्ती असते.
गेल्या वर्षी कोबी, मिरची, टोमॅटो, वांगी या पिकांना बऱ्यापैकी दर मिळाला होता. साहजिक या वर्षीही शेतकऱ्यांनी या भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली. मागील पंधरवाड्यापर्यंत टमाटे, कोबी, वांगी, मिरची यांना बऱ्यापैकी दर मिळत होता. दहा बारा रुपये का होईना भाव मिळत असल्याने, शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन खर्चाइतके तरी पैसे पडत होते. मात्र मागच्या आठड्यापासून कोबी, फ्लॉवर, टमाटे, वांगी यांचे भाव चार – पाच रुपयांपेक्षा कमी दराने विक्री होत असल्याने, शेतकरी पुरता हतबल झाला आहे.

विडेवाडी येथील तरुण शेतकरी राजेंद्र धनाजी देवरे यांनी दोन एकर क्षेत्रात देशी रैवया जातीच्या काळ्या वांग्याच्या वाणाची लागवड केली होती. त्यासाठी त्यांनी दोन एकर क्षेत्राकरिता ठिंबक, पाइप, मल्चिंग पेप असा सुमारे ४८ हजार रुपये खर्च केला होता. त्यानंतर सुरुवातीलाच दोन ट्रक शेणखत व रोप, मशागत यासाठी ५० हजार खर्च झाला होता. तीन महिन्यात अनेक वेळा रासायनिक खते, जैविक खते, मजूरी, दर आठवड्याला फवारणी असा ४५ हजार म्हणजे एकूण १ लाख ५० हजार रुपये खर्च केला होता.
खर्चा रुपया आमदनी अठन्ना
कसमादेमधील शेतकरी स्वतः शेतात राबून मोठ्या कष्टाने शेती फुलवतो. फळं, भाजीपाला पिकवतो त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही करतो. पण बाजारात माल घेऊन गेल्यावर व्यापारी कवडीमोल भाव देवून त्याची लूट करतो. यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने, शेतकऱ्यासाठी मात्र खर्चा रुपया अन् आमदनी अठन्ना अशी गत होते.
– कुबेर जाधव (समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना, नाशिक)
तीन महिन्यांच्या मेहनतीनंतर सुरुवातीला पहिल्या दोन तोडणीला सुरत मार्केटला ४०० ते ४५० रुपये जाळी दर मिळाला. खर्च वजा जाता ३०० रुपये दर मिळाला परंतु आठवड्या उलटल्यानंतर मोठ्या प्रमाणात वांगी निघाली. सुमारे ट्रकभर वांगी भरून सुरत मार्केटला पाठवले तेव्हा काही जाळ्या १६० रुपये प्रती जाळीप्रमाणे विक्री झाली. ६० रुपये तोडणी व वाहतूक खर्च वजा जाता हाती १०० रुपये आले. बाकीची वांगी कवडीमोल भावातही कोणीही न घेतल्याने, फेकून द्यावी लागली. अद्यापपर्यंत मालाच्या बिलपट्ट्या आलेल्या नागी. मागील आठवड्यात एक ट्रॅक्टर वांगी तोडून नदी काठावर अक्षरशः फेकून दिल्याचे शेतकरी राजेंद्र धनाजी देवरे यांनी उद्विग्न होत सांगितले.







