काबूल विमानतळावरील आत्मघाती हल्ल्यांमध्ये ६० जण ठार; १४० जखमी; तालिबानने केला हल्ल्याचा निषेध

काबूल : तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देशाबाहेर पडण्यासाठी लाखो नागरिकांची धडपड सुरू असताना गुरुवारी काबूल विमानतळ स्फोटांनी हादरले. विमानतळाबाहेर झालेल्या दोन आत्मघाती स्फोटांत ६० जण ठार झाले असून, किमान १४० जण जखमी झाले. मृतांमध्ये १२ अमेरिकी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

देशाबाहेर पलायनासाठी काबूल विमानतळावर हजारोंनी गर्दी केली आहे. या गजबजलेल्या विमानतळाच्या प्रवेशद्वारावर एक आणि विमानतळाबाहेरील एका हॉटेलजवळ एक असे दोन आत्मघाती स्फोट झाले. स्फोटांमुळे विमानतळावर एकच गोंधळ उडाला.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सर्वप्रथम स्फोटांतील मृत आणि जखमींबाबत माहिती दिली. या स्फोटांत १२ अमेरिकी कर्मचारी ठार झाल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अफगाणिस्तानातील आयसिस संलग्न संघटनेने (आयसिस-के) हा हल्ला केल्याचा संशय आहे. तालिबानने या हल्ल्याचा निषेध केला. अमेरिकी सैन्याच्या नियंत्रणाखालील भागात हा हल्ला झाल्याचे तालिबानने म्हटले आहे.

afganistan-airport-blast

अफगाणिस्तानातील आपापल्या देशांच्या नागरिकांना सुखरूप परत आणण्याची अनेक देशांची मोहीम काबूल विमानतळावर अंतिम टप्प्यात आहे. या बचाव मोहिमेदरम्यान अमेरिकेसह मित्रराष्ट्रांच्या सैन्यावर हल्ला न करण्याची ग्वाही तालिबानने दिली होती. अमेरिकेने जाहीर केल्यानुसार ३१ ऑगस्टपर्यंत सर्व परदेशी सैन्य माघारी गेले पाहिजे, अशी भूमिका तालिबानने घेतली आहे.

अफगाणिस्तानातून पलायनासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी झालेल्या काबूल विमानतळावर आत्मघाती बॉम्बहल्ल्याची भीती अमेरिका, ब्रिटनसह अन्य देशांनी आधीच व्यक्त केली होती. अमेरिकी दूतावासाने बुधवारी रात्री काबूल विमानतळाच्या तीन प्रवेशद्वारांजवळ न थांबण्याची सूचना आपल्या नागरिकांना केली होती. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि न्यूझीलंडनेही आपल्या नागरिकांना विमानतळावर न जाण्याचे आवाहन केले होते. अखेर या देशांची भीती खरी ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here