महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर.
मुरुड (प्रतिनिधी राजेश बाष्टे) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. उपाध्यक्ष, महासचिव, सचिव, प्रवक्ते यासह अनेक नवे पदाधिकारी या कार्यकारिणीत जाहीर करण्यात आले आहेत. रायगड मधून स्व.मधुशेठ ठाकूर यांचे पुत्र ऍड.प्रवीण मधुकरराव ठाकूर व स्व.माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांची प्रदेश काँग्रेसचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली असून रायगड काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी उरणचे महेंद्र तुकाराम घरत यांची निवड करण्यात आली आहे.
अॅड.ठाकूर यांनी कोकणचे सुपुत्र बॅरिस्टर ए.आर.अंतुले व लोकनेते स्व.मधुशेठ ठाकूर, स्व.माणिकराव जगताप यांचा लोकहिताचा वारसा पुढे सुरू ठेवणार अडल्याचे सांगून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांचे या नियुक्तीबद्दल आभार मानले आहेत. पेणचे चंद्रकांत पाटील व नंदा राजेंद्र म्हात्रे यांची महासचिव म्हणूनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. धनंजय देशमुख, मोईन शेख व असिफ तवक्कल यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
अॅड. प्रवीण ठाकूर हे सक्रिय नेते असून, माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे ते जेष्ठ पुत्र आहेत. रायगड जिल्ह्यातील ते प्रसिद्ध वकील असून जिल्हा बार कौन्सिलचे अध्यक्ष तसेच लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सैन्य निधीला दरवर्षी लाखो रुपयांची आर्थिक मदत, मुंबई-मांडवा रो-रो सेवा, अलिबागसाठी रेल्वे सेवेसाठी पाठपुरावा, स्थानिकांचा रोजगार अशा विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवीत राहिल्याने तरुण वर्गात ते प्रसिद्ध आहेत. जिल्हास्तरावर सर्व तालुक्यात परिचित असल्याने तसेच तरुण वर्गामध्ये प्रसिद्ध आहेत.अॅड. प्रवीण ठाकूर यांची प्रदेश काँग्रेस कमिटीवर निवड झाल्याने अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला नवीन संजीवनी मिळेल अशी अपेक्षा काँग्रेसचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.ऍड.प्रवीण ठाकूर यांचे जिल्हाभरातून अभिनंदन करण्यात येत आहे. उपाध्यक्षांच्या यादीत काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव समावेश आहे. त्यामुळे राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा त्यांच्या पत्नी चालवतील हे स्पष्ट आहे.
शिस्तपालन कमिटीचे अध्यक्ष म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात पृथ्वीराज चव्हाण यांची महत्त्वाची भूमिका होती मात्र ना त्यांनी विधानसभा अध्यक्षपद स्वीकारलं ना मंत्रीपद.. काँग्रेस कार्यशैली बाबत सोनिया गांधींना पत्र लिहिणार्या 23 जणांच्या यादीत पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश होता. आता त्यांच्याकडे राज्यात शिस्तपालन कमिटीचं अध्यक्षपद देण्यात आला आहे. तर अमरजित मनहास यांच्याकडे खजिनदार पद देण्यात आलं आहे.
कार्यकारणी सोबतच 14 जिल्हाध्यक्षांच्या निवडीदेखील काँग्रेसने जाहीर केलेल्या आहेत.धवलसिंह मोहिते पाटील सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तर विक्रम सिंह सावंत सांगली ग्रामीणचे अध्यक्ष तर महेंद्र तुकाराम घरत हे रायगडचे अध्यक्ष असणार आहेत.






