ढाका : बांगलादेशच्या ब्राह्मणबेरिया जिल्ह्याजवळ शुक्रवारी एक बोट उलटल्याने सात मुलांसह किमान २१ जणांचा बुडून मृत्यू झाला. ब्राह्मणबेरियामधील लैशका बिलाजवळ शोधमोहीम सुरू असून सुमारे ५० जण बेपत्ता आहेत.
बोटीत प्रवाशांची संख्या क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचे वृत्त आहे. एकंदर १०० पेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन जाणारी ही बोट दुसऱ्या वाळूने भरलेल्या ट्रॉलरला धडकल्यानंतर बुडाल्याने मृतांची संख्या आणखी वाढू शकते, असे ब्राह्मणबेरियाच्या उपायुक्त यांनी अधिकृत वृत्तसंस्था बीएसएसला सांगितले. जिल्हा प्रशासनाने मृतांच्या कुटुंबाला २० हजार टका देण्याची घोषणा केली आहे. तसेच अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली आहे.
बांगलादेशातील अशाच घटनांच्या मालिकेतील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी मे महिन्यात मदारीपूर जिल्ह्याजवळ पद्मा नदीत स्पीडबोट आणि वाळू वाहक ट्रॉलर यांच्यात झालेल्या अपघातात किमान २५ जणांचा मृत्यू झाला होता. एप्रिलमध्ये नारायणगंज जिल्ह्यात एका फेरी अपघातात २७ जणांचा मृत्यू झाला होता.






