हरियाणा पोलिसांकडून शेतकऱ्यांना झालेली क्रूर मारहाण पूर्णपणे अयोग्य – शरद पवार

हरियाणा (प्रदेश उपसंपादक नंद पाल) : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात पंजाब हरियाणा भागातील शेतकरी आंदोलन करत आहेत, याच पार्श्वभूमीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यावर कर्नाल जिल्ह्यात पोलिसांनी लाठीचार्ज केला.या घटनेचा संपूर्ण देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या कार्यक्रमाचा निषेध करण्यासाठी हे शेतकरी विविध ठिकाणांवर रास्ता रोको आंदोलन करत होते.

पोलिसांच्या या लाठीहल्ल्यात दहाजण जखमी झाल्याचे प्राथमिक माहीतीत समोर आले आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हरियाणा पोलिसांकडून शेतकऱ्यांना झालेली क्रूर मारहाण पूर्णपणे अयोग्य आहे. शेतकऱ्यांचा हा निषेध शांततापूर्ण सुरु असताना देखील पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. त्यामुळे अनेक शेतकरी जबर जखमी झाले आहेत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो.” अशा शब्दात शरद पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जात अनेक शेतकरी जबर जखमी झाले आहेत, जखमी शेतकऱ्यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, यामुळे सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध नोंदवला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here