मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : बिग बॉसचा फेम अभिनेता अरमान कोहली पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. ड्रग्ज प्रकरणी शनिवारी अरमानच्या घरावर छापा टाकल्यानंतर एनसीबीला कोहलीच्या घरी ड्रग्स सापडले आहे.आता नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोनं त्याला अटक केली आहे.
एनसीबीला गेल्या काही दिवसांपासून मुंबईत ड्रग्जबद्दल बरीच माहिती मिळाली होती, त्यानंतर एनसीबीने एक ऑपरेशन सुरू केलं आणि त्याला रोलिंग थंडर असं नाव दिलं. अरमान कोहलीच्या घरावर रोलिंग थंडर ऑपरेशन अंतर्गत छापा टाकण्यात आला. त्यातच त्याला ताब्यात घेण्यात आलं. एवढंच नाही तर आणखी काही मोठी नावे यात सामील होण्याची चिन्ह आहेत.
मागील काही दिवसांपासून एनसीबीने ड्रग्स तस्करीविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत कालपासून मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली जात आहे. या कारवाईमध्ये एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी १५ पेक्षा अधिक ड्रग्स पेडलर्सना अटक केली आहे. एनसीबीचे अधिकारी या ड्रग्स तस्करांची चौकशी करत आहेत. चौकशीदरम्यान ड्रग्स तस्करीमध्ये अभिनेता अरमान कोहलीचा समावेश असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. त्यानंतर याच माहितीच्या आधारे एनसीबीने आज अरमान कोहलीच्या घरावर छापेमारी केली. या कारवाईत एनसीबीला अरमानच्या घरी ड्रग्स सापडले आहे. हे ड्रग्स किती आहे ? त्याची बाजारमूल्यानुसार काय किंमत आहे ? याची माहिती मिळू शकलेली नाही.






