मुंबई (प्रतिनिधी) : क्रिकेटचे द्रोणाचार्य वासू परांजपे यांचे सोमवारी निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. हिंदुस्थानातीलच नव्हे तर परदेशातील क्रिकेटपटूंना त्यांचा परीसस्पर्श लाभला. असंख्य क्रिकेटपटूंना घडवणारे वासू परांजपे यांच्या निधनानंतर क्रीडाक्षेत्रात शोककळा पसरली आहे. हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू व निवड समिती सदस्य जतीन परांजपे याचे ते वडील होत.
वासू परांजपे यांनी मुंबई तसेच बडोदे या संघांसाठी स्थानिक क्रिकेट खेळले. त्यांनी 29 प्रथमश्रेणी सामन्यांत आपली चमक दाखवली. क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द संपल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा क्रिकेट प्रशिक्षणाकडे वळवला. त्यामध्येही त्यांना घवघवीत यश मिळाले.असंख्य क्रिकेटपटूंना घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.






