आरोग्य विभागाने राबविली स्वच्छता मोहीम; नागरिकांमध्ये समाधान
जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : शहरातील प्रभाग क्र. 16 या सिंधी कॉलनी परिसरातील सार्वजनिक शौचालयातील अस्वच्छता, चेतनदास मेहता रुग्णालय ते नेत्रज्योती हॉस्पिटल या रस्त्यावर ठिकठिकाणी कचर्याचे ढीग पडून असल्याने या भागात पसरलेली दुर्गंधी, वाढलेल्या डासांच्या उत्पत्तीमुळे निर्माण झालेल्या समस्यांसंदर्भात सोमवार, दि.30 ऑगस्ट 2021 रोजी ‘लोकमत’ने छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची याच दिवशी दखल घेऊन ‘महापौर सेवा कक्षा’ने तत्परतेने आपल्याकडे तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर संबंधित तक्रार ‘महापौर सेवा कक्षा’ने महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी श्री.जितेंद्र किरंगे यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविली. त्यांनी संबंधित ठिकाणाची पाहणी करून आपल्या विभागातील कर्मचार्यांना तत्काळ सूचना दिल्या. त्यानंतर संबंधित परिसरात महापालिकेने स्वच्छता मोहीम राबवून कचर्याचे ढीग उचलण्यासह हा परिसर संपूर्णपणे स्वच्छ करून चकाचक केला.
यासंदर्भात परिसरातील नागरिकांकडून या सतर्कतेचे स्वागत होऊन घरबसल्या तक्रार निवारण झाल्याचे प्रत्यक्ष अनुभवास आल्याने त्यांच्यात मोठे समाधान व्यक्त होत आहे. महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन या सुद्धा नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसह जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच तत्पर आहेत. या अनुषंगाने त्याही ‘महापौर सेवा कक्षा’च्या कार्यप्रणालीकडे तितक्याच जबाबदारीपूर्ण लक्ष देत असतात. आवश्यकता भासल्यास थेट ‘महापौर सेवा कक्षा’शी संपर्कही साधतात.
या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनीही अशीच सतर्कता दाखविणे गरजेचे आहे. यापुढेही आपण सविस्तर संवाद करण्यासाठी/माहिती देण्यासाठी ‘महापौर सेवा कक्ष’ हेल्पलाईन क्र. 95 90 269 269 यावर सकाळी 9 ते दुपारी 1 व दुपारी 2:30 ते सायं. 5 या वेळेत (शासकीय सुटी वगळता) कॉल करून आपली समस्या/तक्रार सविस्तर नोंदवून तक्रार निवारण करता येईल. ‘महापौर सेवा कक्ष’ आपल्या समस्या/तक्रारींचा पाठपुरावा करण्यासाठी तत्पर आहे.






