टोकियो : येथे सुरु असणाऱ्या पॅरालिम्पिकमध्ये सोमवारचा दिवस भारतीय खेळाडूंनी गाजवला. खेळाडूंनी पदके मिळविल्याने रीडाप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण असतानाच एका भारतीय खेळाडूचं कांस्यपदक काढून घेण्यात आलं आहे. थाळीफेकपटू विनोद कुमार यांचं कांस्यपदक काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुमार यांना झालेला विकार हा पॅरालिम्पिकच्या नियमांमध्ये बसत नसल्याचे सांगत त्याचं पदक काढून घेण्यात आलं आहे. विनोद यांनी तिसरा क्रमांक पटकावल्यानंतर त्यांना झालेला आजार हा पॅऱालिम्पिकच्या नियमांनुसार क्लासिफाय केला जाऊ शकतो का यावरुन प्रश्न उपस्थित करण्यात आला. यामुळेच त्यांचं मेडल रोखण्यात आलं होतं. यासंदर्भातील तपास केल्यानंतर कुमार यांना पदक नाकारण्यात आलं आहे.
Tokyo Paralympics Technical Delegates decide Vinod Kumar is not eligible for Discus F52 class, his result in the competition is void and he loses the bronze medal pic.twitter.com/m5zzaaINZX
— ANI (@ANI) August 30, 2021
आयोजकांनी २२ ऑगस्ट रोजी विनोद यांचं वर्गीकरण केलं होतं. वर्गीकरणाला कोणत्या आधारावर आव्हान दिले गेले हे स्पष्ट करण्यात आलं नाही. क्रीडा आयोजकांनी दिलेल्या निवेदनानुसार कुमार यांच्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने या स्पर्धेचा पदक वितरण समारंभ ३० ऑगस्टच्या संध्याकाळच्या सत्रापर्यंत पुढे ढकलण्यात आला.
दरम्यान, विनोद यांचं पदक काढून घेण्यात आल्याने भारताची पदक संख्या सातवरुन सहावर घसरली आहे. विनोद यांच्या पदकासहीत रविवारी भारताची पदकसंख्या तीनपर्यंत पोहोचली होती. मात्र विनोद यांचं पदक काढून घेण्यात आल्याने भारताच्या खात्यावर रविवारची दोन आणि सोमवारीच चार अशी एकूण सहा पदकं आहेत. रविवारी टेबल टेनिसमध्ये भाविना पटेल, तर उंच उडीमध्ये निशाद कुमारने रौप्यपदक कमावले. सोमवारी भारतीय खेळाडूंनी एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदक मिळवत दमदार कामगिरी केली.






