विमानतळ हद्दीत अवैधधंदा आढळल्यामुळे संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेवर कारवाई करुन पोलीस आयुक्त आपला शब्द खरा करणार का?
पुणे (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक सदानंद काळे) : शहरात सर्वत्र कडेकोटपणे अवैध धंदे बंद असताना विमाननगर हद्दीत मात्र हुक्क्याची ‘तलफ’ भागविण्यासाठी सुरू असलेल्या बारवर गुन्हे शाखा व सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करुन कारवाईचा दणका दिला आहे.
हॉटेल तलब, देवकर चौक, देवकर वॉशिंग सेंटरजवळ अवैधरित्या हुक्का बार चालु होते. याबाबत वरिष्ठांकडे गोपनिय माहिती प्राप्त झाल्यामुळे सामाजिक सुरक्षा विभाग पो.नि. शिल्पा चव्हाण, अंमली पदार्थ विरोधी पथक-२ पो.नि. विनायक गायकवाड यांचे पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता हॉटेल मालक सचिन अशोक रणपिसे रा.येरवडा, अमर संतोष गायकवाड रा.येरवडा व हॉटेल मॅनेजर दिलीपकुमार मांगीलाल मालविया रा.हडपसर हे अवैधरित्या हुक्का बार चालविताना सापडले. याबाबत हॉटेलचे मालक व मॅनेजर यांच्याविरूद्ध तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ४अ, २१अ तसेच भादंवि कलम २६९, २७० अन्वये विमानतळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्त डॉ.अमिताभ गुप्ता यांनी हद्दीत सुरू असलेल्या अवैधधंद्यांबाबत संबंधित वरिष्ठ निरिक्षकाला जबाबदार धरण्यात येईल असे सुनावले होते व त्याअनुषंगाने हमीपत्र घेतले होते. विमानतळ हद्दीत अवैधधंदा आढळल्यामुळे संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेवर कारवाई करुन पोलीस आयुक्त आपला शब्द खरा करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.






