चेंबूरमध्ये पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून चिमुकल्याचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : आई किराणा सामान आणण्यासाठी गेली असता घरात खेळता खेळता बाथरूममध्ये गेलेल्या चार वर्षीय मुलाचा पाण्याने भरलेल्या बादलीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चेंबूरमध्ये घडली आहे. देवांश घाटविसावे असे मृत मुलाचे नाव असून याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

चेंबूरच्या मारोली चर्च येथील नालंदा नगर परिसरात देवांश आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. सोमवारी दुपारी देवांशची आई उर्मिला घाटविसावे ही किराणा सामान आणण्यासाठी घराबाहेर पडली. यावेळी घरामध्ये देवांशसोबत उर्मिला यांचे सासरे आणि भाची होती. घरी परतल्यानंतर उर्मिला यांनी देवांशबद्दल विचारले असताना भाचीने तो वरच्या खोलीत झोपला असल्याचे सांगितले.

उर्मिला यांनी खोलीत जाऊन पाहिले असता देवांश बेडवर दिसला नाही. आजूबाजूला कुठेच तो दिसत नसल्याने त्या बाथरूममध्ये गेल्या. बाथरूममधील पाण्याने भरलेल्या बादलीत देवांश डोक खाली आणि पाय वर अशा अवस्थेत आढळला. बेशुद्धावस्थेत असलेल्या देवांशला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.याप्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे चेंबूर पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here