सप्टेंबरमध्ये कोरोनाचे निर्बंध कडक होणार? – अस्लम शेख

राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीचे पालन योग्य प्रकारे केले गेले तर पुढे निर्बंध लावण्याची गरज भासणार नाही- शेख

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सप्टेंबर अखेरपर्यंत कोरोना प्रतिबंधक नियम कसे असतील याबाबत महत्वाचे विधान केले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली असून या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ती वेळीच थोपवून धरता यावी म्हणून उपाययोजना सुरु केल्या आहेत.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील राज्यातील कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. याबाबत माहिती देताना सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत तर कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली तर निर्बंध कडक करण्यात येतील, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

कोरोना नियंत्रणात येत नसल्यास महाराष्ट्राच नाईट कर्फ्यूच्या पर्यायाचा विचार करण्याची सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारला दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने देखील राज्यातील ज्या भागांमध्ये कोरोनाच्या रुग्णवाढीचा दर अधिक आहे अशा भागांमध्ये नाईट कर्फ्यू लावता येतो का, याबाबत विचार सुरू केला होता. मात्र सध्या तरी नाईट कर्फ्यु, संचारबंदी किंवा जमावबंदीची गरज नसल्याचे अस्लम शेख यांनी सांगितले. टास्क फोर्सने सांगितल्यानुसार सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. जर या अंदाजानुसार रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध कडक करण्याची गरज आहे, असेही शेख म्हणाले.

रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसल्यास कोरोनाचे निर्बंध कडक करण्यात येतील. मात्र राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीचे पालन योग्य प्रकारे केले गेले तर पुढे निर्बंध लावण्याची गरज भासणार नाही. मात्र, सध्या ठिकठिकाणी गर्दी वाढताना दिसत आहे. परदेशात अमेरिका, युरोपसारख्या देशांमध्ये करोना प्रतिबंधक लशीच्या दोन डोसनंतरही रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज असल्याचे मत अस्लम शेख यांनी व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here