यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून अभिषेक सराफ प्रथम

Maski,Karnataka,India - January 4,2019 : Union Public Service Commission printed in book with large letters.

नवी दिल्ली – केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा २०१९ परिक्षांचा अंतिम निकाल मंगळवारी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला. परिक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती नियुक्ती यादी जाहीर करण्यात आली आहे. देशात प्रदीप सिंह हा पहिला आला असून त्यापाठोपाठ जतिन किशोर, प्रतिभा वर्मा, हिमांशू जैन, जयदेव सी. एस यांनी पहिल्या ५ मध्ये स्थान मिळवले आहे. मराठमोळ्या अभिषेक सराफ हा महाराष्ट्रातून प्रथम आला असून त्याने पहिल्या १० यशस्वी उमेदवारांच्या यादीत आठवे स्थान मिळवले आहे. अभिषेक याच्यासह नेहा भोसले हिने १५ वे तर मंदार पत्की याने २२ वे स्थान मिळवले आहे.
पंढरपूरमधील शेतकरी कुटुंबातील अभयसिंह देशमुखने यूपीएससी परीक्षेत १५१ वे स्थान पटकावले असून त्याची आयएएससाठी निवड झाली आहे. तर, अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळख असलेल्या माढा तालुक्यातील उपलाई बुद्रुक येथील अश्विनी वाकडे हिने २०० वा रँक मिळवला आहे.
सप्टेंबर,२०१९ घेण्यात आलेली लेखी परीक्षा आणि फेब्रुवारी-ऑगस्ट, २०२० मध्ये घेण्यात आलेल्या मुलाखतींच्या आधारावर आयोगाने गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. परिक्षेत उत्तीर्ण झालेले पहिले १० उमेदवार पुढीलप्रमाणे – प्रदीप सिंह, जतीन किशोर, प्रतिभा वर्मा, हिमांशू जैन, जयदीप सी एस, विशाखा यादव, गणेश कुमार भास्कर, अभिषेक सराफ, रवि जैन, संजिता मोहापात्रा
निवड झालेल्या उमेदवारांची उपलब्ध जागांनुसार लवकरच नियुक्ती करण्यात येईल. गुणवत्ता यादीनुसार निवड झालेल्या उमेदवारांची आयएएस, आयपीएस, आयएफएस, भारतीय रेल्वे खाते सेवा अंतर्गत रेल्वे गट अ आणि भारतीय टपाल सेवेसह काही इतर सेवांमध्ये नियुक्ती करण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये जनरल कॅटगरी मधील ३०४, ईडब्ल्यूएस मधील ७८, ओबीसीमधील २५१, अनुसुचित जातींमधील १२९ तर अनुसुचित जमातींमधील ६७ अशा एकूण ८२९ उमेदवारांचा समावेश आहे. यूपीएससीकडून १८२ विद्यार्थ्यांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले आहे. यातील ९१ उमेदवार सामान्य, ९ ईडब्ल्यूएस, ७१ ओबीसी, ८ अनुसूचित जाती तसेच ३ अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here