करजई व डामरखेडा येथील शेतकरी रास्ता रोको आंदोलनाच्या पवित्र्यात

राष्ट्रीय महामार्ग पाच निर्मितीसाठी हस्तगत केलेल्या
जमिनीचा मोबदला न मिळाल्याने रास्ता रोको

शहादा (विजय पाटील) – तालुक्यातील डामरखेडा व करजई येथील शेतकऱ्यांनी आमच्या जमिनीचा मोबदला द्या अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन उपविभागीय भूमिलेख अधिकारी कार्यालय तालुका शहादा यांना सादर केले.राष्ट्रीय महामार्ग 5 बऱ्हाणपूर-अंकलेश्वर या महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू असून यात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी एम आर डी सी यांनी संपादित केलेल्या आहेत.यामुळे शेतकर्‍यांचे शेती पिकांचे नुकसान झालेले आहे.
सध्या सुमारे पाच महिन्यापासून कोरोना वायरसचा आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला असून शेतकरी खूप मोठ्या समस्येला सामोरं जात आहे.वारंवार तक्रार करूनही कोणी याकडे लक्ष द्यायला तयार नसल्या कारणाने मौजे करजई व डामरखेडा येथील शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांच्या जमिनी हडप करून महामार्गाचे काम सुरू केले असा आरोप एम आर डी सी अधिकारी व भूमापन अधिकारी यांच्यावर करण्यात आला आहे.या महामार्ग निर्मितीसाठी किती शेती जाणार याची देखील माहिती शेतकऱ्यांना संबंधित विभागांना देण्यात आलेली नाही. म्हणून गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचे व्याजासहित रेडीरेकनर प्रमाणे पैसे द्यावे व पिकांचे झालेले नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे.
तसेच महामार्ग भुमापनाचे काम बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असून लवकरात लवकर कामाला वेग द्यावा व जातीने याकडे लक्ष द्यावे अशी आर्त हाक हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी शासन दरबारी केलेली आहे. प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढावे नाहीतर नाईलाजास्तव 15 ऑगस्ट रोजी सोशल डिस्टंसिंग चे पालन करत आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे.आता तरी या वाईट काळात हे सरकार आपल्याला मदतीचे हात देईन हीच अपेक्षा शेतकरी सरकारकडे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here