कांतीलाल कडू यांनी घेतली ना. बाळासाहेब पाटील यांची मंत्रालयात भेट
मुंबई-सोगावकर: कर्नाळा बँकेचे आवसायक जी.जी.मावळे यांच्या बदलीचे आदेश रद्द करण्याचे निर्देश सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज, मंगळवार (ता. ७) सहकार आयुक्त अनिल कवडे यांना दिले. मंत्री महोदयांच्या आदेशाचे पत्र त्यांचे खासगी सचिव संतोष पाटील यांनी तातडीने आयुक्तांना पाठवून दिले.
पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू आणि सहकारी योगेश पगडे यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची मंत्रालयात त्यांची भेट घेवून मागणीचे निवेदन दिले. त्यावर आदेश देत त्वरित कार्यवाही करण्याचे ना.पाटील यांनी कवडे यांना सुचित केले आहे.
कर्नाळा बँकेत ५४३ कोटीचा घोटाळा झाल्यानंतर पनवेल संघर्ष समितीने प्रशासकीय आणि राजसत्तेसोबत बैठका, पत्रव्यवहार करून हे प्रकरण धसास लावण्याचे साहसी प्रयत्न केले आहे. रिझर्व्ह बँकेने कर्नाळा बँकेचा व्यावसायिक परवाना रद्द करावा म्हणून कांतीलाल कडू यांनी थेट उपराष्ट्रपती व्यकंय्या नायडू यांना साद घातली होती. त्यांनी आणि राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केलेल्या सहकार्याने अखेर बँक परवाना रद्द करून घेण्यात पनवेल संघर्ष समितीला यश आले आहे. तर सहकार मंत्री आणि मुख्यमंत्री कार्यालयानेही सकारात्मक सहकार्य करून कांतीलाल कडू यांचा लढा यशस्वी केला.
दरम्यान ईडीकडून बँकेच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी विवेकानंद पाटील यांना अटक करण्यात पनवेल संघर्ष समितीने यश मिळविल्यानंतर रायगडाच्या राजकीय वर्तुळात धडकी भरली आहे. अनेकांना अद्यापही अटकेची स्वप्ने पडत असून झोपेतून खडबडून जागे होत आहेत. बँकेच्या अवसायकपदी जी.जी.मावळे यांची नियुक्ती केल्यानंतर अवघ्या नऊ दिवसात सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी राजकीय दबावापुढे नमते घेवून श्रेणी १ च्या मावळे यांच्या जागी सहकार निबंधक बालाजी वाघमारे यांची नियुक्ती करून ठेवीदारांना मोठा धोका दिला. त्याविरोधात पनवेल संघर्ष समितीने आंदोलनाचा इशारा दिला होता.
आज ना.बाळासाहेब पाटील यांची भेट घेवून कांतीलाल कडू आणि योगेश पगडे यांनी मंत्री महोदयांशी सविस्तरपणे चर्चा केली. त्यांना निवेदन दिले. मंत्री महोदयांनी विचारलेल्या प्रश्नांना कडू यांनी अतिशय चपलखपणे उत्तरे दिली. यावेळी त्यांनी आयुक्त कवडे यांना संघर्ष समितीच्या मागणीवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.यानंतर कडू यांनी सहकार खात्याचे प्रधान सचिव अनुप कुमार यांची भेट घेवून या संदर्भात सविस्तरपणे चर्चा केली. त्यांनीही सकारात्मकता दर्शवत विशेष कार्य अधिकारी तथा सह निबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांना तातडीने लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत.






