कांचीपूरम (तामिळनाडू) : येथे २० वर्षांच्या तरुणीवर ५ जणांनी कारमध्ये बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडिता एका मोबाइलच्या दुकानात काम करते. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीच्या मित्रानेच दुसरी नोकरी देण्याचं आमिष दाखवून तिची भेट आपल्या अन्य मित्रांसोबत केली होती. काही दिवसांपूर्वी पीडितेची मैत्री गुनासीलन नावाच्या तरुणासोबत झाली होती. दोघे नियमित दुकानावर भेटत होते.
दोघे सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलत असत. गुनासीलनने आपल्या एका मित्रासोबत पीडितेची ओळख करून दिली होती. दोघांनी तरुणीला एका खासगी कंपनीत नोकरीला लावून देण्याचं वचन दिलं होतं. ८ सप्टेंबर रोजी गुनासीलन पीडितेला कारमधून कांचीपुरममधील एका फार्म हाऊसमध्ये घेऊन गेला. रस्त्यात तिला सॉफ्ट ड्रिंकमधून नशेचं औषध टाकलं होतं. जेव्हा पीडिता बेशुद्ध झाली तेव्हा त्याने आपल्या चार मित्रांना बोलावलं आणि कारमध्येच तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी पीडितेला हायवेवर सोडलं.. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या पायांनी कारमधील खिडकी तोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर स्थानिकांचं लक्ष कारकडे गेलं.
यानंतर आरोपी पीडितेला चेन्नई बंगळुरू हायवेवर फेकून पळाले. पीडितेला कांचीपुरममधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कांचीपुरम एसपीने आरोपींना अटक करण्यासाठी आणि या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्पेशल टीमचं गठण केलं आहे. पोलिसांनी ९ सप्टेंबर रोजी ४ आरोपींना अटक केली आहे. तर पाचव्या आरोपीला १० सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आहे.







