नाशिक येथे पूरग्रस्त शेतकरी महिलेची विष पिऊन आत्महत्या

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शेतकरी मंदाबाई भाऊसाहेब काकळीज (वय ४७, न्यायडोंगरी, नांदगाव) यांनी शेतातच विष पिऊन आत्महत्या केली. याघटनेने न्यायडोंगरी सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

भाऊसाहेब काकळीज यांची न्यायडोंगरी नांदगाव रोड लगत शेती आहे. त्यात कांदा, कपाशी, मक्का ही पिके अत्यंत जोमदार आली होती. परंतु गेल्या तीन चार दिवसात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे परिसरातील सर्वच नदी नाल्यांना पूर आला. नदी काठच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात काकळीज यांची शेती नाल्याचे दोन्ही बाजूंनी असल्याने ऐन बहरात आलेले कांदा, मक्का, कपाशी ही नगदी पिके पूर्णतः नष्ट झाली आहेत.

पाण्यामुळे शेतातील माती ही मोठ्या प्रमाणात वाहून गेली. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचे साधनच हिरावले गेले. हे दु:ख सहन न झाल्याने मंदाबाई यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे. शेतातील राहत्या घरीच त्यांनी विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. मंदाबाई यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, पती, सासू, सुना, नातवंडे असा परिवार आहे. नांदगांव पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here