साताऱ्यातील नवविवाहित तरुणाचा पाण्याच्या टाकीवरुन आत्महत्येचा प्रयत्न

सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) : येथील नगरपालिकेच्या समोर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी समोर आला. गुरुवार पेठ भागात राहणाऱ्या या तरुणाने अक्षरशः शोले स्टाईल थरार केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला वेळीच सुखरुप खाली उतरवण्यात यश आले आहे.

अवघ्या चार दिवसांपूर्वी या तरुणाचे लग्न झाले आहे. मात्र कौटुंबिक वादामुळे मानसिक ताण निर्माण होऊन तो पाण्याच्या टाकीवर चढला आणि त्यातून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

दरम्यान, तरुण थेट पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. पोलिसांनी तरुणाला समजावून त्याला खाली उतरवले. त्याचे व्यवस्थित समुपदेशन करुन त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कोकरे यांनी दिली आहे. तरुण सुखरुप असल्यामुळे सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here