पनवेल (प्रतिनिधी विनया मेढेकर) : राजापुरातील एका रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा समोर आला आहे. रस्त्यात सापडलेले पाकिट सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून त्यांनी त्या व्यक्तीला परत केले आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सगळीकडे कौतुक होत आहे.
राकेश बेनकर असे या रिक्षाचालकाचे नाव असून त्यांना गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी रिक्षा घेऊन जात असताना चिंचबांध-कोंढेतड पुलावर रस्त्यात एक पाकीट सापडले. पाकीट उघडले असता त्यात महत्वाच्या कागदपत्रांसह रोख रक्कमही होती. पाकीटातील आधार कार्डवरून पाकीट शुभम शामसुंदर धावडे (रा. हातिवले, धावडे वाडी) यांचे असल्याचे समजले. मात्र धावडे यांच्याशी संपर्क होत नव्हता.
अखेर बेनकर यांनी शक्कल लढवत सोशल मीडियाची मदत घेतली. सोशल मीडियावर चिंचबांध-कोंढेतड पुलावर त्यांना रस्त्यात एक पाकीट सापडल्याचा मेसेज प्रसारीत केला आणि अवघ्या काहीवेळात त्यांचा शुभम धावडे यांच्याशी संपर्क झाला. त्यानंतर त्यांना भेटून पाकीट परत करण्यात आले. बेनकर यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल सगळीकडे त्यांचे कौतुक होत आहे.






