मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : साकीनाका परिसरात घडलेल्या अत्यंत अमानूष अशा प्रकाराने समाजमन हादरुन गेले आहे. एका विकृत परप्रांतीयाने ३२ वर्षाच्या महिलेवर पाशवी बलात्कार करीत निर्दयपणे मारहाण करून तिची हत्या केली. गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्याने अबलेची रुग्णालयात मृत्यूशी सुरू असलेली झुंज सुमारे ३३ तासांनंतर अपयशी ठरली. त्यावरून, विरोधी पक्षांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात कायद्याचा धाक उरला नसल्याचंही भाजपाने म्हटले आहे. त्यामुळे, सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं आपली भूमिका मांडली आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात असे कायद्याचेच राज्य आहे. विरोधकांनी साकीनाका बलात्कारप्रकरणी कितीही धुरळा उडवला तरी कायद्याच्या राज्यास तडा जाणार नाही. विरोधी पक्षनेते सांगतात, त्याप्रमाणे त्या नराधमाला फाशीची शिक्षा होईल. कोणत्या विषयाचे व प्रकरणाचे राजकारण करायचे याचे भान ठेवायलाच हवे. साकीनाकाप्रकरणी डोळय़ांत अश्रू यावेत ही मनाची संवेदनशीलता आहे, पण नक्राश्रू ओघळू लागले की, भीती वाटते, प्रकरणाचे गांभीर्य नष्ट होते, असे शिवसेनेनं म्हटले आहे.
पोलिसांना त्यांचे काम करू द्या. तरीही साकीनाका प्रकरणाची फाईलही कुणाला ‘ईडी’ वगैरेकडे सोपवायची असेल तर त्यांना कोण रोखणार? काय वाट्टेल ते करू द्या !, असेही राऊत यांनी अग्रलेखात म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाने या प्रकरणात विरोधी पक्षाची जी काही भूमिका आहे ती चोख बजावली आहे. मुंबई-महाराष्ट्रात महिला कशा सुरक्षित नाहीत असे तो आता ओरडून सांगत आहे. साकीनाक्याच्या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला असला तरी मुंबई हे महिलांसाठी जगातील अत्यंत सुरक्षित शहर आहे, याविषयी कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही, असेही राऊत यांनी म्हटले आहे. अशा घटना एका भयानक विकृतीतून घडत असतात व जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात ही विकृती उफाळून येऊ शकते, असेही ते म्हणाले.







