
अलिबाग-सोगावकर – मुंबई, ठाणे आणि परिसराला मंगळवारी पावसाने झोडपून काढलं. पावसाचा हा जोर पुढचे तीन दिवस कायम राहणार आहे. पुणे वेधशाळेने हा इशारा दिला आहे. येत्या 72 तासात कोकण, गोवा, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे. तसंच घाटमाथा, पुणे आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं पुणे वेधशाळेचे प्रमुख संशोधक डॉ अनुपम कश्यपी यांनी म्हटलं आहे.
कृष्णा आणि भीमा नदीच्या खोऱ्यातही येत्या 15 दिवसात चांगला पाऊस पडेल. त्यामुळे ऑगष्ट महिन्यात राज्यातील धरणसाठ्यातही नक्कीच समाधानकारक वाढ होईल, असंही कश्यपी यांनी सांगितलं.राज्यात सध्या मुंबईसह घाटमाथ्यावर पडत असलेल्या पावसाचा जोर पुढचे तीन दिवस कायम राहिल, त्यानंतर थोडीसी उघडीप होऊन 9 ऑगष्टला राज्यात पावसाचा आणखी जोर वाढेल असंही कश्यपी यांनी सांगितलं.
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एकाचवेळी कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पाऊस पुन्हा परतला आहे. सध्या मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर असला तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा फारसा जोर नाही, त्यामुळे शेतकरीही चिंताग्रस्त आहे.गेल्या 24 तासांपासून मुंबईत धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सांताक्रुझ भागात नाल्याला लागून असलेली 2 घरं कोसळली आहे. या दुर्घटनेत 1 महिला आणि 3 मुली नाल्यात पडल्या आहे. एका मुलीला वाचवण्यात यश आले आहे. तर दोन तासांच्या प्रयत्नानंतर जान्हवी काकडे नावाच्या दीड वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला आहे.






