तडीपार असतानाही अल्पवयीनावर केला चाकूहल्ला; हडपसरमधील टोळीविरूद्ध मोक्का कारवाई

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : तडीपार असतानाही शहरात येत अल्पवयीन मुलावर वार करणाऱ्या हडपसरमधील टोळीवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून करण्यात आलेली ही ५४ वी कारवाई आहे. टोळीप्रमुख आकाश दादासाहेब भापकर (वय १९, रा. लोणी काळभोर) योगीराज ऊर्फ भैय्या संदीप पानसरे( वय २१,रा. माळवाडी, हडपसर) आणि अभिजीत संजय सावंत (वय २३, रा.फुरसुंगी) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

अल्पवयीन मुलगा १ ऑगस्टला संध्याकाळी त्याच्या मित्राला भेटण्यासाठी गॅरेजवर गेला होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या भैय्या पानसरे व त्याच्या इतर दोन मित्रांनी मुलाकडे गाडी पुसायला कापड मागितले होते. कापड न दिल्याने टोळक्याने त्याच्या गालावर, डोक्यावर चाकूने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. हल्ला झालेल्या मुलाच्या मित्राचे वडील भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांच्यावरही चाकूने वार करुन त्यांनाही जखमी केले होते. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

टोळीचे वर्चस्व रहावे म्हणून व अवैध मार्गाने आर्थिक फायदा व्हावा यासाठी मुलावर वार करीत गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले होते. संबंधीत टोळीवर हडपसर पोलीस ठाण्यातंर्गत खंडणीची मागणी, हत्यारासह गंभीर दुखापत करणे असे पाच गंभीर गुन्हे दाखल झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी उपायुक्त नम्रता पाटील यांच्यातर्फे मोक्काचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांना पाठविला होता. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक राजू अडागळे, पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, गोरख दरेकर, प्रवीण शिंदे, प्रशांत नरसाळे, बाबासाहेब शिंदे, गिरीश एकोर्गे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here